बिजापूर (छत्तीसगड) - नक्षलवाद्यांसोबत शुक्रवारी झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) तीन जवान शहीद झाले व एक मुलगी ठार झाली. सीआरपीएफची १९९ वी बटालियन आणि राज्याचे पोलीस मोटारसायकलवर त्या भागात गस्त घालत असताना केशकुतुल (जिल्हा बिजापूर) खेड्याजवळ नाल्यापाशी सकाळी ११ च्या सुमारास ही चकमक झाली, असे बिजापूरचे पोलीस अधीक्षक दिव्यांग पटेल यांनी सांगितले. या चकमकीत दोन मुलीही सापडल्या, त्यात एक मरण पावली, तर दुसरी जखमी झाली.मोटारसायकवर ही गस्त घालणारी तुकडी केशकुतुल येथील छावणीपासून भैरामगडकडे निघाली होती.केशकुतुलमधून ही तुकडी जात असताना सशस्त्र नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू करताच चकमक सुरू झाली, असे पटेल म्हणाले. सीआरपीएफचे दोन जण जागीच ठार झाले, तर तिसरा जखमी होऊन मरण पावला.दोन सहायक उपनिरीक्षक महादेव पी. (५०, कर्नाटक), मदन पाल सिंह (५२, उत्तर प्रदेश) आणि हेड कॉन्स्टेबल साजू ओ. पी. (४७, केरळ) यांचा चकमकीत मृत्यू झाला. दोन अल्पवयीन मुली मालवाहतुकीच्या वाहनातून चकमकीच्या ठिकाणाहून जात असताना तीत सापडल्या. त्यात एक मरण पावली, तर दुसरी जखमी झाली, असे पटेल म्हणाले. घटनास्थळी कुमक पाठवण्यात आली आहे.घटनास्थळी झडती घेतली असता दोन दूर नियंत्रक स्फोटक उपकरणे हाती लागली. दुसऱ्या एका पोलीस अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार नक्षलवाद्यांनी एके-४७ रायफल व तिच्या चार मॅगझिन्स, एक बुलेटप्रूफ जॅकेट आणि सुरक्षादलांचे एक बिनतारी संदेश यंत्र लुटून नेले.
नक्षलवाद्यांशी चकमकीत सीआरपीएफचे तिघे शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 4:55 AM