लखनौ - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह (Kalyan Singh) यांचे शनिवारी रात्रीच्या सुमारास निधन झाले. त्यांनी लखनौमधील एसजीपीजीआय रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या दीड महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी उत्तर प्रदेशात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा पाळला जाणार असून, 23 ऑगस्टला सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासंदर्भात माहिती देताना, "कल्याण सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला जाईल. त्यांच्यावर 23 ऑगस्टला सायंकाळी नरोरा येथे गंगा नदीच्या किनाऱ्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. तसेच, 23 ऑगस्ट रोजी सार्वजनिक सुट्टी असेल," असे म्हटले आहे.
कल्याण सिंह यांचे पार्थिव सर्वप्रथम त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येईल. यानंतर, उद्या लोकांना आदरांजली देता यावी यासाठी विधानसभा आणि लखनौ येथील भाजप कार्यालयात ठेवण्यात येईल. यानंतर सायंकाळी त्यांचे पार्थिव अलीगढ आणि त्यानंतर 23 ऑगस्ट रोजी अत्रौली येथे नेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी रुग्णालयात जाऊन केली होती विचारपूस -योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी रुग्णालयात जाऊन कल्याण सिंह यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. दरम्यान, त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली होती. त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. तसेच त्यांना व्हेंटिलेटरवही ठेवण्यात आले होते, शिवाय हाय प्रेशर ऑक्सिजनही देण्यात आला होता. परंतु शनिवारी रात्री त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि त्यांची प्राणज्योत मालवली.