लोकमत न्यूज नेटवर्क, लखनौ : उत्तर प्रदेशातील उष्णतेची लाट कायम आहे. परिस्थिती एवढी भीषण झाली आहे की, लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने शाळांच्या उन्हाळी सुट्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गांना आता २८ जूनपर्यंत सुट्या असतील. यापूर्वी सुट्या १५ जूनपर्यंत होत्या. दरम्यान, वाराणसीत आज उष्णतेमुळे महिला पर्यटकांसह ३ जणांचा मृत्यू झाला. पुढील काही दिवस दिल्ली आणि उत्तर भारतीय राज्यांमध्ये असेच हवामान राहण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेशसह पाच राज्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्यानुसार, मान्सून १५ जून रोजी गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि बिहारमध्ये दाखल होऊ शकतो. त्यामुळे या सर्व राज्यांमधील लोकांना उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
उष्णतेचा केंद्रबिंदू
- राजधानी दिल्ली आणि उत्तर भारतीय राज्यांमध्ये उष्णतेचा कहर सुरूच आहे. अनेक राज्यांमध्ये पारा विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. शुक्रवारी उत्तर प्रदेशातील प्रयागराज हे देशातील सर्वांत उष्ण शहर ठरले. तेथे कमाल तापमान ४६.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. गोरखपूरमध्ये दुपारी ४ वाजता ४२ अंश तापमान होते. राज्यात मान्सूनचे आगमन होण्यास आणखी सात दिवसांचा अवधी आहे.
- दिल्लीपासून बिहार, झारखंड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेशपर्यंत कमाल तापमान ४५ अंशांच्या आसपास राहिले.