श्रीनगर - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जम्मू-काश्मीरसह देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. जम्मू-काश्मीरच्या जम्मू जिल्ह्यात एलओसीवर तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. मात्र यावेळी झालेल्या चकमकीत चार जवान जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव जवानांनी उधळून लावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी यासाठी जोरदार गोळीबार सुरू केला होता. या गोळीबारात सैन्याचे चार जवान जखमी झाले. दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव फसला. भारतीय जवानांनी केलेल्या कारवाईत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांचे मृतदेह एलओसीवर पाकिस्तानच्या बाजुला पडलेले आहेत व ते अद्यापही पाकिस्तानी सैन्याने उचललेले नाहीत. 2021 मध्ये पाकिस्तानकडून केलं गेलेलं हे पहिलं मोठं शस्त्रसंधीचं उल्लंघन आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
प्रजासत्ताक दिनी जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या घातपाताची शक्यता, दहशतवादी हल्ला घडवण्याचा पाकिस्तानचा कट
प्रजासत्ताक दिनी जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दहशतवादी हल्ला घडवण्याचा पाकिस्तानचा कट असल्याची माहिती मिळत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा हल्ला करण्याचा कट पाकिस्तानने आखला आहे. पाकिस्तान लष्कारातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वात अल-बद्र या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांना प्रशिक्षण दिलं जात असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
दहशतवादी हल्ला घडवण्याचा पाकिस्तानचा कट
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय गुप्तचर यंत्रणांना अल-बद्रचे अतिरेकी आणि पाकिस्तानी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील फोनवरील चर्चेची ऑडिओ क्लिप मिळवली आहे. या चर्चेत ते काश्मीरमध्ये मोठा घातपात घडवण्याचा डाव आखत असल्याची माहिती मिळाली आहे. सूत्रांनी अल-बद्र दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांची एक टीम आणि त्या व्यतिरिक्त आणखी आठ अतिरेक्यांना गेल्या दोन महिन्यांपासून विशेष प्रशिक्षण दिलं जात असल्याची माहिती दिली आहे.