श्रीनगर - कुरापती पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे. यामध्ये भारतीय सैन्यातील तीन जवानांसहीत एक अधिकारी शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. शहीद झालेले जवान 120 इन्फंट्री ब्रिगेडमधील आहेत.
महाराष्ट्रातील मेजर प्रफुल्ल मोहरकर शहीद दरम्यान, पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्रातील मेजर प्रफुल्ल मोहरकर शहीद झाले आहेत. मोहरकर हे मूळचे भंडारा जिल्ह्यातील होते. त्यांचे वय 32 वर्ष एवढे होते. त्यांच्या पश्चात पत्नी अबोली व मोठा आप्त परिवार आहे. जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील केरी सेकटरमध्ये मेजर मोहरकर यांच्या नेतृत्वात नियंत्रण रेषेवर पेट्रोलिंग सुरू असताना पाकिस्ताननं शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत गोळीबार केला. त्यात मेजर मोहरकर यांच्यासह जवान कुलदीप सिंग, जवान परगत सिंग आणि जवान कुलदीप सिंग शहीद झाले.
शहीद मेजर प्रफुल मोहरकर यांच्याविषयीची माहिती प्रफुल आंबादास मोहरकर भंडारा जिल्हा पवनी तालुक्यातील जुनोना गावातील रहिवासी होते. अवोली मोहरकर असे त्यांच्या पत्नीचे नाव आहे. तीन वर्षांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. प्रफुल्ल 6 वर्षांपूर्वी म्हणजे 2012मध्ये इंडियन आर्मीमध्ये भर्ती झाले होते. त्यांचे शिक्षण B.E.पर्यंत झाले होते. प्रफुल्ल दिवाळीमध्ये पावनी येथे आले होते. प्रफुल्ल मोहरकर यांचे वडील आंबादास मोहरकर सेवा निवृत्त शिक्षक आहेत. आईदेखील शिक्षिका आहेत. त्यांचे लहान बंधू परेश मोहरकर पुण्यामध्ये नोकरी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारानंतर भारतीय जवानांनीही सडेतोड उत्तर देण्यास सुरुवात केली. केरी सेक्टर परिसरात ही चकमक सुरू होती. यापूर्वी 18 ऑक्टोबरला पूंछ जिल्ह्यात भारतीय लष्काराच्या चौक्यांना पाकिस्ताननं निशाणा साधत हल्ला केला होता. पाकिस्तानच्या या गोळीबारात 7 स्थानिक जखमी झाले होते. पूंछच्या बालाकोटमधील 4 स्थानिक नागरिकही जखमी झाले होते.
तर दुसरीकडे 2 ऑक्टोबरला पाकिस्ताननं केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात जम्मूतील पूंछ सेक्टर परिसरातील तीन जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये एका 10 वर्षीय मुलाचाही समावेश होता. तर 5 जण जखमी झाले होते.
वर्षभरात 900 वेळा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन
शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन पाकिस्तानने वर्षभरात 900 वेळा जम्मू-कश्मीरमध्ये गोळीबार केला आहे. पाकड्यांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन 780 वेळा नियंत्रण रेषेपलिकडून तर 120 वेळा आंतरराष्ट्रीय सीमेपलिकडून जम्मू-कश्मीरमध्ये गोळीबार केला, अशी माहिती भारतीय लष्कारानं दिली आहे.