ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 14 - बंदिपोरा जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन जवान शहीद झाले आहेत. जवानांनीदेखील दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं असून एक दहशतवादी ठार झाला आहे. चकमकीत एकूण नऊ जवान जखमी झाले आहेत. यामध्ये लष्कराच्या पाच जवानांचा समावेश आहे. जिल्ह्यातील हाजीन परिसरात ही चकमक झाली. जखमी जवानांना एअरलिफ्ट करण्यात आलं असून श्रीनगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही जवानांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. चकमक अद्यापही सुरु असून जखमी जवानांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
काही दहशतवादी रहिवासी परिसरात लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि लष्कराने संयुक्त सर्च ऑपरेशनला सुरुवात केली होती. यावेळी लपलेल्या दहशतवाद्यांनी फायरिंग करण्यास सुरुवात केली. फायरिंगमध्ये लष्कराने पाच जवान आणि चार पोलीस जवान जखमी झाले आहेत. यावेळी दहशतवाद्यांनी वेढा तोडून पळून जाण्याचा प्रयत्ने केला, मात्र ते फसले. एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी पहाटे झडलेल्या भीषण चकमकीत चार अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले. यात दोन जवान शहीद व एक नागरिक ठार झाला. चकमकीचे राज्यात हिंसक पडसाद उमटल्यानंतर आक्रमक जमावाला पांगवण्यासाठी लष्कराने केलेल्या गोळीबारात १ ठार, तर १५ जखमी झाले.
कुलगाम जिल्ह्यातील नगबल गावात लष्कर-ए-तोएबा व हिज्बुल मुजाहिदीनचे अतिरेकी लपले असल्याची गुप्त खबर मिळाल्यानंतर लष्कराने कारवाई केली. सुरक्षा दलांचे हे मोठे यश आहे. ज्या घराच्या परिसरात चकमक सुरू होती; त्या घरमालकाचा मुलगा यात सापडला व दुर्दैवाने ठार झाला, असे पोलीस महासंचालक एस.पी. वैैद यांनी सांगितले.