रायपूर : छत्तीसगढमध्ये नक्षल प्रभावित कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत महिला नक्षलीसह तीन नक्षलींना ठार करण्यात आले. यावेळी सशस्त्र सीमा दलाचा (एसएसबी) एक जवान जखमी झाला. बस्तर क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी सांगितले की, तोडोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पादकेलबेडा व कोसरडा गावातील जंगलात सुरक्षा दलांनी तीन नक्षलींना ठार केले. ठार करण्यात आलेल्या नक्षलींवर एकूण १८ लाख रुपयांचे बक्षीस आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, एसएसबी व जिल्हा दलाच्या संयुक्त दलाला गस्तीवर रवाना करण्यात आले होते. जंगलात असताना नक्षलींनी त्यांच्यावर गोळीबार केला. सुरक्षा दलानेही याला चोख प्रत्युत्तर दिले. चकमकीनंतर काही नक्षली घटनास्थळाहून पळून गेले. त्यानंतर सुरक्षा दलाने घटनास्थळाची तपासणी घेतली असता, तीन नक्षलींचे मृतदेह आढळले. ठार करण्यात आलेल्या नक्षलींची ओळख पटली असून, ते पीएलजीएच्या कंपनीचे सदस्य ज्योती, बदरू व गुड्डू हे होते. यातील ज्योतीवर आठ लाख रुपये तर इतर दोन नक्षलींवर प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस होते. घटनास्थळाहून एक इन्सास व एक्स ९५ शस्त्रांसह तीन शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर स्फोटकेही जप्त केली आहेत. आज जप्त केलेली शस्त्रे नक्षलींनी रावघाट भागात २०१८मध्ये सुरक्षा दलांकडून लुटली होती. सुंदरराज यांनी सांगितले की, कांकेर जिल्ह्यात एसएसबीची २८वी व ३३वी बटालियन २०१६पासून तैनात आहे. आजच्या चकमकीत एसएसबी जवान जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस्तर भागात सुरक्षा दलांनी मागील आठवड्यात झालेल्या चकमकींमध्ये सात नक्षलींना ठार केले आहे. या भागात नक्षलविरोधी मोहीम राबविण्यात येत आहे.