श्रीनगर : काश्मीरमधील बांदीपूर जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष व राज्य भाजप कार्यकारिणीचे सदस्य शेख वासीम बारी (२७ वर्षे), त्यांचे वडील शेख बशीर अहमद व भाऊ शेख उमर यांची लष्कर-ए-तैयबाच्या दोन अतिरेक्यांनी बुधवारी रात्री हत्या केली. या हत्या पूर्वनियोजित पद्धतीने करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे असले तरी त्यामगचा नेमका हेतू लगेच स्पष्ट झाला नाही.धक्कादायक बाब अशी की, बांदूपूर पोलीस ठाण्याला अगदी लागून असलेल्या त्यांच्या दुकानात शेख वासीम बारी व त्यांचे कुटुंबीय बसलेले असताना हा खुनी हल्ला केला गेला. जिल्हा पोलीस अधीक्षकांचा बंगलाही या ठिकाणाहून काही मीटर अंतरावर आहे.शहराच्या ज्या भागात हा हल्ला झाला तेथे कायम कडक सुरक्षा असते. शिवाय गेले काही महिने दहशतवादाच्या दृष्टीने बांदीपूर शांत मानले जात असताना ही घटना घडावी, याने सुरक्षा दलेही चक्रावून गेली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भ्याड हत्यांचा निषेध केला व कुटुंबियांचे सांत्वन केले.बारी यांच्या जिवाला असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन, खासकरून जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर, त्यांना आठ सशस्त्र पोलिसांचे संरक्षण देण्यात आले होते; पण या हल्ल्याच्या वेळी यापैकी एकही पोलीस त्यांच्यापाशी नव्हता. कर्तव्यात कसूर करणाऱ्या या पोलिसांना गुरुवारी अटक केली गेली.
नेत्याच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या पोलीस अंगरक्षकांना अटक, काश्मिरात भाजप नेत्यासह तिघांची अतिरेक्यांकडून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 4:39 AM