ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 9 - बहुजन समाज पक्षाच्या (बसप) प्रचंड मोठ्या मेळाव्यामध्ये रविवारी चेंगराचेंगरी होऊन तीन जण ठार तर किमान १२ जण जखमी झाले. येथील कांशीराम स्मारक मैदानावर हा मेळावा झाला. व्यासपीठाच्या दोनपैकी एका पायऱ्यांवरून काही लोक खाली येत असताना त्याचा तोल गेला लोक एकमेकांच्या अंगावर पडले. शांती देवी (६८, रा. बिजनोर) यांच्यासह इतर अज्ञात महिलेचा श्वास गुदमरून जागीच मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, विजेची जिवंत वायर पडल्याची अफवा पसरल्यामुळे चेंगराचेंगरी सुरू झाली. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले, असे बसपच्या स्थानिक प्रवक्त्याने सांगितले.लखनऊमध्ये उकाडा जाणवत असल्यानं उष्माघातानं महिलेचा मृत्यू झाल्याचं खळबळजनक वक्तव्य रामअचल यांनी केलं आहे.बहुजन समाजवादी पार्टीचे संस्थापक कांशीराम यांच्या 10व्या पुण्यतिथीप्रीत्यर्थ लखनऊमध्ये आयोजित केलेल्या रॅलीमध्ये हा प्रकार घडला आहे. याच सभेत मायावतींनी नरेंद्र मोदींवर टीकेचे प्रहार केले आहेत. लखनऊमध्ये २००२ मध्ये बसपच्या चारबाग रेल्वे स्टेशन भागात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात चेंगराचेंगरी होऊन १२ जण ठार तर २२ जण जखमी झाले होते.