भाटपारा - पश्चिम बंगालमधील भाटपारा शहरातील परिस्थिती अजूनही तणापूर्ण आहे. भाजपाकडून भाटपारा हिंसाचारानिमित्त मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाटपारा हिंसाचाराविरोधात चौकशीसाठी भाजपाची समिती स्थापन केली आहे. ही समिती शनिवारी भाटपारा येथे भेट देऊन घडलेल्या घटनेचा निषेध करतील तसेच ही समिती भाटपाडा येथील घटनास्थळाची पाहणी करुन आपला अहवाल अमित शाह यांच्याकडे सादर करतील.
पश्चिम बंगाल येथील भाटपाडा येथे गुरूवारी झालेल्या हिंसाचारा दरम्यान पोलिसांच्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. भाजपा आणि टीएमसीच्या समर्थकांमध्ये वादावादी झाली होती. या हिंसाचाराविरोधात शुक्रवारी भाजपाने विरोध प्रदर्शने केली. तसेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली. परिसरातील तणावाची परिस्थिती पाहता पोलिसांकडून त्याठिकाणी कलम 144 लागू करण्यात आलं होतं. त्यानंतरही भाजपाच्या समर्थकांनी मोर्चा काढला.
पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान 2109 हिंसक घटनांची नोंद झाली आहे. टीएमसी आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तणाव वाढतच चालला असून हिंसा भडकविण्याचा आरोप दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर केला जात आहे. भाटपारा हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी 16 जणांना अटक केली आहे.
भाटपारामधील कायदा-सुव्यवस्थेची बिघडलेली स्थिती लक्षात घेता तिथे नवीन पोलीस ठाणे स्थापन करण्यात आले होते. त्याचे पोलीस महासंचालक वीरेंद्रकुमार यांच्या हस्ते सोमवारी सकाळी उद्घाटन होणार होते. त्याच्या काही तास आधी या परिसरात पुन्हा हिंसाचार उफाळला होता. भातपारामध्ये पोलिसांच्या गोळीबारात दोन जण मरण पावल्याचा भाजपाने केलेला आरोप पोलिसांनी फेटाळून लावला आहे. जमावाला पांगविण्यासाठी फक्त अश्रुधूराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, भातपारातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी आमच्या पक्षाचे एक शिष्टमंडळ तिथे जाणार आहे.
प. बंगालमधील एकेकाळच्या हिंसाचारग्रस्त जंगलमहल, दार्जिलिंगसारखी सध्या भातपाराची अवस्था झाली आहे. भातपारामध्ये परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प. बंगालचे पोलीस महासंचालक, मुख्य सचिव व अन्य ज्येष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेण्यात आली. भातपारामध्ये १९ मे रोजी विधानसभेची पोटनिवडणुक घेण्यात आली. तेव्हापासून या परिसरात तृणमूल काँग्रेस व भाजपत सातत्याने हिंसक संघर्ष होत आहे. गावठी बॉम्ब हल्ला प्रकरणी १८ जणांना अटक करण्यात आली होती.