नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक प्रचारात वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या तीन प्रकरणांत शुक्रवारी निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदी यांना तर एका प्रकरणात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना क्लिन चीट दिली. काँग्रेस पक्ष हा बुडते टायटनिक जहाज आहे, असे मोदी नांदेडच्या सभेत म्हणाले होते. तसेच वाराणसी व लातूर येथील सभेत त्यांनी केलेल्या विधानांवर विरोधकांनी तक्रार केली होती. याबाबत आयोगाने मोदी यांनी क्लिन चीट दिली आहे. वर्धा येथील सभेत केलेल्या वक्तव्याबाबत मोदींना आधीच दिलासा दिला आहे. त्यामुळेमोदी यांना आतापर्यंत चार प्रकरणांमध्ये दिलासा मिळाला आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा एका खून प्रकरणात आरोपी असल्याचा उल्लेख राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशातील एका सभेत केला होता.
या प्रकरणात आयोगाने राहुल यांनाही क्लिन चीट दिली आहे. दरम्यान, मोदी व राहुल गांधी यांच्याविरोधात के लेल्या तक्रारींवर ६ मेच्या आत निर्णय घ्या असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला होता. तीन भाषणे महाराष्ट्रातील बालाकोटवर हल्ला चढविणाऱ्या हवाई दलाच्या शूर सैनिकांना मते द्या असेआवाहन मोदी यांनी लातूरच्या सभेत केले होते. वायनाड मतदारसंघात अल्पसंख्याक हेच बहुसंख्याक असल्याचे वादग्रस्त विधान मोदी यांनी वर्धा येथे केले होते. तर नांदेडच्या सभेत ते काँग्रेसला बुडते जहाज म्हणाले होते. या तिन्ही विधानांबाबत निवडणूक आयोगाने मोदी यांना क्लिन चीट दिली आहे. मोदी यांच्या गुजरातच्या पाटणमधील सभेतील विधानाबाबत विरोधकांनी केलेल्या तक्रारीची चौकशी पूर्ण झालेली नाही.