नवी दिल्ली : हवाई प्रवासात सहप्रवासी किंवा विमान कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणे आता महागात पडू शकते. नागरी उड्डयन मंत्रालयाने शुक्रवारी यासंदर्भात पहिल्यांदा मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. अलीकडेच शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केली होती. त्यावरून मोठा गदारोळ झाला होता. या प्रकरणाचे संसदेतही पडसाद उमटले होते. त्यानंतर आता मंत्रालयाने याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून, त्यांचे उल्लंघन करणाऱ्यांना कडक शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. मंत्रालयाचे सचिव आर.एन. चौबे यांनी नव्या मार्गदर्शक तत्त्वांची पत्रकार परिषदेत माहिती दिली. मंत्रालयाने प्रवाशांचे गैरवर्तन तीन श्रेणीत विभागले आहे. गैरवर्तन करणाऱ्यावर हवाई प्रवास बंदीही घातली जाऊ शकते. यामागे सरकारची राष्ट्रीय नो-फ्लाय यादी बनविण्याची मनीषा आहे. विमानात धुडगूस घालणाऱ्या प्रवाशांचा या यादीत समावेश असेल. या यादीची देखरेख नागरी उड्डयन प्राधिकरण करणार आहे, असेही ते म्हणाले. विमान कंपनी एखाद्या प्रवाशाला तत्काळ प्रवासास मनाई करू शकते. मात्र, याचा अर्थ असा नाही की, त्या व्यक्तीचे नाव लगेच नो फ्लाय लिस्टमध्ये सामील केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे खासदार गायकवाड यांनी एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला चपलेने मारहाण केल्याच्या प्रकरणावरून मोठा वाद झाला होता. एअर इंडियासह जवळपास सर्व विमान कंपन्यांनी त्यांच्या हवाई प्रवासावर बंदी घातली होती. यादरम्यानच अशा प्रवाशांवर निर्बंधांची गरज असल्याची मागणी पुढे आली होती. गायकवाड यांनी माफी मागितल्यानंतर त्यांच्यावरील बंदी उठविण्यात आली. मात्र, नव्या मार्गदर्शक तत्त्वांवरून हे स्पष्ट आहे की, असे वर्तन करणाऱ्यांची आता खैर नाही. (वृत्तसंस्था)नागरी उड्डयन मंत्रालय : नवी मार्गदर्शक तत्त्वे जारीगैरवर्तनाच्या तीन श्रेणी करण्यात आल्या आहेत. पहिल्या श्रेणीतील गैरवर्तनासाठी संबंधित व्यक्तीला तीन महिन्यांसाठी ‘नो फ्लाय लिस्ट’मध्ये टाकले जाईल. (या काळात संबंधित प्रवाशाला हवाई प्रवास करता येणार नाही.) दुसऱ्या श्रेणीत सहा महिने विमान प्रवासास बंदी राहिल, तर तिसऱ्या श्रेणीचे गैरवर्तन करणाऱ्यास दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ विमान प्रवासास बंदी असेल.
विमान प्रवासात गैरवर्तन केल्यास तीन महिने ते आजन्म बंदी
By admin | Published: May 06, 2017 1:19 AM