नांदेड : जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेतील घोटाळ््यात शुक्रवारी पोलिसांनी आणखी तिघांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. यापूर्वी १२ जणांना अटक करण्यात आली आहे.जिल्हा पोलीस दलाची १२ मार्च ते १ एप्रिल २०१८ या कालावधीत ६९ शिपाईपदाची भरती प्रक्रिया झाली. परीक्षेत अनेकांना सारखेच गुण मिळाले होते़ सीसीटीव्ही फुटेजमध्ये मात्र हे सर्व जण पेपर न सोडविता वेळ कधी संपतो याची वाट पाहत असल्याचे आढळून आले़ चौकशीनंतर परीक्षा प्रक्रियेतील सहभागी यंत्रणेला हाताशी धरुनच हा घोटाळा झाल्याचे पुढे आले होते़पोलीस शिपाई नामदेव ढाकणे, एसएसजी सॉफ्टवेअरचे शिरीष अवधूत, स्वप्निल साळुंके यांच्यासह ओंकार संजय गुरव, शिवाजी श्रीकृष्ण चेके, आकाश दिलीप वाघमारे, सलीम महमद शेख, समाधान सुखदेव मस्के, किरणअप्पा मस्के, सुमित दिनकर शिंदे,अब्दुल मुखीद मकसूद अब्दुल आणि संतोष माधवराव तनपुरे अशा बारा जणांना पोलिसांनी अटक केली होती़ त्यांना न्यायालयाने ३ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी कृष्णा जाधव (रा़ सावरखेडभोई), हनुमान भिसाडे (रा़ रिसोड) व रामदास भालेराव (रा़ बहाद्दरपुरा) यांना अटक केली. तिघेही परीक्षार्थी असून या प्रकरणात प्रवीण भटकर याच्यासह आणखी पाच जणांचा पोलीस शोध घेत आहेत़
पोलीस भरती घोटाळ्यात आणखी तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:56 AM