भारतीय हवाई दलाची (IAF) ताकद आता आणखी वाढणार आहे. फ्रान्समधून 'राफेल'च्या तीन लढाऊ विमानांची तुकडी आज रात्री १०.३० वाजता भारतात जामनगर एअरबेसवर दाखल होणार आहे. भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
भारतीय हवाई दलात सध्या ११ राफेल विमानं आहेत. यात आता आणखी तीन विमानं दाखल झाल्यानंतर राफेल विमानांची संख्या १४ वर पोहोचणार आहे. येत्या काळात भारतात आणखी १० राफेल विमानं दाखल होणार आहेत. भारतात सध्या असलेली ११ राफेल विमानं अंबालामध्ये स्वॉड्रन १७ मध्ये दाखल आहेत. या विमानांना चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पूर्व लडाखमध्ये तैनात करण्यात आलं आहे.
भारत आता लवकरच स्वदेशी पद्धतीनं विकसीत झालेल्या स्टेल्थ फायटर्स अॅडवान्स मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्टसोबतच ११४ मल्टीरोल लढाऊ विमानांची ऑर्डर देणार आहे.
हवाई दलाची ताकद वाढणारचीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाची ताकद वाढणं हे देशासाठी अतिशय महत्वाचं मानलं जात आहे. आज तीन राफेल लढाऊ विमानांची तुकडी भारतात पोहोचणार आहे. तिनही विमानं जामनगर एअरबेसवर दाखल होणार आहेत. यावेळी विमानांचं जोरदार स्वागत केलं जाईल.
७ हजार किमीचा प्रवास करुन पोहोचणार राफेलफ्रान्स ते भारत असा तब्बल ७ हजार किमी प्रवास पूर्ण करत राफेल विमानं आज भारतात दाखल होत आहेत. यूएईमध्ये या विमानांमध्ये 'एअर टू एअर' रिफ्यूलिंग देखील केलं जाणार आहेत. म्हणजेच यूएईमध्ये या तिनही विमानांमध्ये हवेतच इंधन भरलं जाणार आहे.