नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट होण्यासाठी अजून तीन राफेल लढाऊ विमाने भारतात दाखल झाली आहे. बुधवारी रात्री ११ वाजता गुजरातमधील जामनगरच्या हवाई तळावर या विमानांनी दिमाखात लँडिंग केले. फ्रान्समधून निघाल्यानंतर सलग उड्डाण करत ही विमाने भारतात पोहोचली आहेत. यादरम्यान या विमानांनी वाटेत यूएईच्या मदतीने एअर टू एअर रिफ्युएलिंग केले होते. आज दाखल झालेल्या विमानांसोबतच भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील एकूण राफेल विमानांची संख्या १४ वर पोहोचली आहे. यापूर्वी ११ राफेल विमाने भारतात आली आहेत. तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजून ८ राफेल विमाने एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात भारतामध्ये येण्याची शक्यता आहे. याशिवाय राफेलचे ट्रेनर व्हर्जनसुद्धा भारतात येणार आहे. भारताने एकूण ३६ राफेल विमानांसाठी फ्रान्ससोबत करार केला आहे.
अजून तीन राफेल विमाने भारतात दाखल, जामनगर एअरबेसवर केलं दिमाखात लँडिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 00:55 IST