लखनऊ - अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मस्जिद भूमी वादाकडे धार्मिक दृष्टीकोनातून पाहिले जाते. पण प्रत्यक्षात अयोध्येत श्रीराम मंदिराच्या सेवेत तीन मुस्लिमही महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे समोर आले आहे. अयोध्येत रामजन्मभूमी परिसरात मंदिराच्या सुरक्षेसाठी तारांचे कुंपण घालण्यात आले आहे. मुसळधार पाऊस किंवा वादळामुळे जेव्हा या तारा तुटतात तेव्हा सार्वजनिक बांधकाम खात्याकडून अब्दुल वाहिद यांना पाचारण केले जाते.
38 वर्षीय वाहिद पेशाने उत्तम वेल्डर आहेत. मंदिराकडून बोलवणे आल्यानंतर वाहिद लगेच आपले वेल्डिंगचे साहित्य घेऊन पोहोचतात आणि तुटलेल्या तारा जोडून देतात. त्यांना या कामासाठी दिवसाचे 250 रुपये मिळतात. आपल्यालाही हे काम करण्यात एक वेगळा आनंद मिळतो असे अब्दुल वाहिद यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे सादिक अलीही प्रभूरामचंद्रांच्या सेवेत आहेत. पेशाने टेलर असलेले सादिक अली सदरा, लेंगा, जॅकेट, पगडी आणि पँटी शिवतात. त्यांच्याकडे प्रभू रामांसाठी वस्त्रे शिवण्याची जबाबदारी आहे. प्रभू रामचंद्रासाठी वस्त्रे शिवण्यात आपल्याला एक वेगळा अभिमान वाटतो असे त्यांनी सांगितले. दर काही महिन्यांच्या अंतराने सादिक अली यांना राम जन्मभूमी मंदिराच्या मुख्य पूजा-यांकडून प्रभू रामांसाठी कपडे शिवण्याची विनंती केली जाते. आपल्या सर्वांसाठी देव एकच आहे असे अली यांनी सांगितले.
अयोध्येत राम मंदिराच्या सेवेत महत्वाची भूमिका बजावणारी तिसरी व्यक्ती आहे मेहबूब. सादिक अली यांचे मित्र असलेले मेहबूब यांनी 1995 साली सीता कुंडाच्याजवळ स्वयंपाकघरात पाण्याची व्यवस्था करण्यासाठी मोटार बसवून दिली होती. शहरातील बहुतांश मंदिरांच्या इलेक्ट्रीसिटीचे काम मेहबूब पाहतात. प्रभू रामचंद्राची मुर्ती ठेवलेली जागा 24 तास प्रकाशमान ठेवण्याची जबाबदारी मेहबूब यांच्याकडे आहे. मागच्या दोन दशकांपासून हे तिघे अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित आहेत. मी 1994 सालापासून मंदिराशी संबंधित आहे. त्यावेळी मी माझ्या वडिलांकडून इलेक्ट्रीसिटीचे काम शिकत होतो. मी भारतीय असून सर्व हिंदू माझे भाऊ आहेत असे मेहबूबने सांगितले.