रायपूर (छत्तीसगढ) : छत्तीसगढच्या राजनांदगाव जिल्ह्यात सुरक्षादलांसोबत बुधवारी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. त्यांच्यावर रोख इनाम जाहीर झालेले होते.खडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोपेनकडका खेड्यात रात्री दहाच्या सुमारास चकमक सुरू झाली. सुरक्षा दलांची संयुक्त तुकडी नक्षलवाद्यांच्या विरोधात कारवाई करीत असताना ही चकमक उडाली, असे राजनांदगावचे पोलीस अधीक्षक प्रशांत अग्रवाल यांनी सांगितले. इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस आणि मानपूर उपविभागीय पोलीस अधिकारी आकाश गिरपुंजे यांच्या नेतृत्वाखालील तुकडीने एकत्रितपणे मानपूरच्या अंतर्गत भागात कारवाई सुरू केली होती. मानपूर रायपूरपासून सुमारे २०० किलोमीटर आहे. गस्तीवरील ही तुकडी कोपेनकडकाच्या जंगलात आत- आत जात असताना तिच्यावर जोरदार गोळीबार सुरू झाला. नंतर या तुकडीनेही त्याला जोरदार प्रतिकार केला. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाल्यावर नक्षलवादी दाट जंगलात पळाले. शोधमोहिमेत तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागले. त्यांच्याकडून तीन स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली. त्यात एक एके ४७ रायफल, एक इन्सॅस रायफल आणि एक एसएलआर रायफलचा समावेश आहे.
छत्तीसगढमधल्या राजनांदगाव जिल्ह्यात चकमकीत तीन नक्षलवादी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 4:51 AM