नवी दिल्ली : कोळसा खाणपट्टे वाटपाशी संबंधित प्रकरणांची सुनावणी कराताना दिल्लीच्या विशेष न्यायालयाने छत्तीसगडमधील केसला नार्थ कोळसा खाणपट्टा वाटपातील कथित गैरव्यवहाराप्रकरणी राठी स्टील अॅण्ड पॉवर लि. (आरएसपीएल) तसेच या कंपनीच्या तीन अधिकाऱ्यांना मंगळवारी दोषी ठरविले. शिक्षेविषयी बुधवारी सुनावणी होणार आहे.सीबीआयचे विशेष न्यायाधीश भरत पाराशर यांनी कंपनी तसेच कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप राठी, मुख्य कार्यकारी अधिकारी उदित राठी, सहायक महाव्यवस्थापक (एजीएम) कुशल अग्रवाल यांना भारतीय दंड विधानच्या कलम ४२० (फसवणूक) तसेच १२० (ब) गुन्हेगारी कट आदी कलमान्वये दोषी ठरविले. ते तिघेही जामिनावर होते. त्यामुळे न्यायालयाने तिघा दोषींना ताब्यात घेण्याचेही आदेश दिले. त्यानुसार त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.न्यायालयाने आरएसपीएल तसेच या कंपनीच्या तीन अधिकाऱ्यांविरुद्ध आरोप निश्चित केले होते. कोळसा खाणपट्टे मिळविण्यासाठी कट रचणे, चुकीची माहिती देणे तसेच राष्ट्राच्या नैसर्गिक साधनसंपत्तींचे नुकसान करणे आदी आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. न्यायालयाला आरोपात तथ्य असल्याचे आढळून आले.
आरएसपीएलसह कंपनीचे ३ अधिकारी दोषी
By admin | Published: July 27, 2016 2:24 AM