नवी दिल्ली - ज्ञानवापी मशीद प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे. या प्रकरणी कोर्टाने तीन पर्याय दिले आहेत. त्यासह न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी सांगितले की, जिल्हा न्यायाधीशांना आपल्या न्यायबुद्धीनुसार या प्रकरणाची सुनावणी करावी, कारण ते अनुभवी न्यायालयीन अधिकारी असतात. सुप्रीम कोर्टामध्ये या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती नरसिंहा आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांचं खंडपीठ करत आहे.
सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी तीन सल्ले देताना सांगितले की, आम्ही खालच्या कोर्टाला सांगतो की, मुस्लिम पक्षाच्या अर्जावर त्यांनी लवकर सुनावणी करून खटला निकाली काढावा. तसेच जोपर्यंत ट्रायल कोर्ट या अर्जावर निर्णय घेईल, तोपर्यंत आमचा अंतरिम आदेश प्रभावी राहील. तसेच न्यायमूर्तींनी सांगितले की, आम्ही खालच्या कोर्टाला काही विशिष्ट्य पद्धतीने काही करण्यासाठी सांगू शकत नाही. कारण त्यांना आपलं काम माहिती आहे. तर मशीद कमिटीने सांगितले की, आतापर्यंत ट्रायल कोर्टाने जे आदेश दिले आहेत, ते वातावरण बिघडवू शकतात. त्यावर चंद्रचूड यांनी सांगितले की, या प्रकरणात दोन्ही पक्षांच्या अधिकारांवर मर्यादा आणली जाईल. तुम्ही केसच्या मेरिटवर बोला.
त्याबरोबरच कोर्टाने मुस्लीम पक्षाला सांगितले की, आम्ही तुमच्या बाजूनेच सल्ला देत आहोत. जर १९९१ च्या कायद्यानुसार खटल्याची वैधता निश्चित केली जाणार असेल, तर खूप कठीण परिस्थिती निर्माण होईल. आम्ही कमिशनच्या रिपोर्टच काय करायचं हे ट्रायल जज यांना सांगू शकत नाही. त्याबाबतीत ते सक्षम आहेत, असेही न्यायमूर्तींनी सांगितले.