नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील (Jammu and Kashmir) बारामुल्लामध्ये दहशतवादी आणि काश्मीर पोलीस यांच्यात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. हे तीन दहशतवादी जैश ए मोहम्मदचे असल्याची माहिती काश्मीर पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली. उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला भागात बुधवारी सकाळी जम्मू काश्मीर पोलीस आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू झाली. दहशतवाद्यांना बेछूट गोळीबार सुरु केल्यावर पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. "आम्ही जैश ए मोहम्मद अतिरेकी संघटनेच्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. गेले ३-४ महिने ते या भागात सक्रीय होते आणि दहशतवादी कारवाया करत होते. आम्ही त्यांच्या मागावरच होतो. अखेर आज त्यांना ठार करण्यात आले. या चकमकीत एका पोलिस कर्मचाऱ्यालाही वीरमरण आले", अशी माहिती पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली.
बुधवारी सकाळी जम्मू काश्मीर पोलीस आणि भारतीय जवानांची संयुक्तपणे कारवाई केली. त्यांची बारामुल्लाच्या क्रीरी गावात दहशतवाद्यांशी चकमक झाली. पोलीस आणि लष्कराचे जवान यांनी दहशतवाद्यांना समर्पण करण्यास सांगितल्यानंतर अतिरेक्यांकडून गोळीबाराला सुरूवात झाली आणि त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना पोलीस व जवान यांची दहशतवाद्यांशी चकमक झाली आणि त्यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तर एक पोलीस कर्मचारी शहीद झाला.