ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 25 - बनावट पासपोर्टच्या आधारावर भारतात येऊन वास्तव्य केल्याच्या आरोपाखाली दोन महिलांसह तीन पाकिस्तानच्या नागरिकांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री (दि.24) कुमारस्वामी लेआऊटमध्ये पोलिसांनी धाड टाकली असता याठिकाणी तीन पाकिस्तानचे नागरिक बनावट पासपोर्टच्या आधारावर राहत होते. त्याच्यांकडून आधार कार्डसह अनेक कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. या नागरिकांना मदत केल्याच्या आरोपावरुन एका भारतीय नागरिकाला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे. समीरा, काशीफ शमशुदीन आणि किरन गुलाम अली अशी अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानच्या नागरिकांची नावे आहेत. तर, मोहम्मद शिहाब असे त्यांना मदत करणा-या भारतीयाचे नाव आहे. मोहम्मद शिहाब हा मूळचा केरळचा आहे.
चार जणांना पासपोर्ट कायद्याचे उल्लंघन आणि बनावट कागपत्रांचा वापर केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या चौघांची राज्य पोलिसांकडून आणि केंद्रीय संस्थांकडून चौकशी सुरु आहे. चारही आरोपी सुरुवातीला कतारमध्ये एकत्र काम करत होते. त्यावेळी ते एकमेकांच्या संपर्कात आले. त्यानंतर काठमांडूमार्गे भारतातील पटनामध्ये आले. पटनामधून नंतर पुन्हा बंगळुरुत आल्याचे, बंगळुरुचे पोलीस आयुक्त प्रवीण सूद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.