ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ - विमानतळावरुन तस्करीचा माल बाहेर काढण्यासाठी अनेकदा गुन्हेगार वाटेल त्या थराला जातात. आपण कल्पानाही करणार नाही शरीरातील अशा ठिकाणी ते वस्तू लपवून ठेवतात. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर असेच एक प्रकरण समोर आले आहे. तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू पण बुधवारी डीआरआय अधिका-यांनी विमानतळावर अटक केलेल्या तिघांनी ३.९ लाख युरो म्हणजे २.९ कोटी रुपये शरीराच्या मलमार्गात दडवून ठेवले होते.
मलमार्गाच्या जागेमध्ये जी किंचित पोकळी असते त्या पोकळीमध्ये त्यांनी ही रक्कम दडवून ठेवली होती. गुंडाळलेल्या प्लास्टिक पाऊचमध्ये हे युरो होते. दुबईवरुन आलेल्या विमानातून संध्याकाळी ४.३० वाजता हे तिघे विमानतळावर उतरले. डीआरआय अधिका-यांनी झडती घेतली असता त्यांच्या पगडीमध्ये आधी युरो सापडले.
नंतर मलमार्गात दडवलेले पाऊच जप्त केले. आयजीआय विमानतळावरुन ते इंडिगो विमानाने दुस-या ठिकाणी जाणार होते. या तिघांची डीआरआयला आधीच माहिती मिळाली होती. ते बोर्डींग पाससाठी चेकइन काऊंटरच्या दिशेने जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. परकीय चलन देशात आणायला कोणतीही मर्यादा नसली तरी, त्याचा स्त्रोत दाखवता आला पाहिजे. डीआरआयला यामागे मोठी टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे.