ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 7 - जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी रात्री उशीरा पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाल्याचं वृत्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार कुलगाम जिल्ह्यात झालेल्या या हल्ल्यात एका पोलिसासह तीन नागरिकांचा मृत्यू मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.
कुलगाममधील मीर बाजार परिसरात शनिवारी रात्री उशीरा हा हल्ला करण्यात आला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मीर बाजार परिसरात काही पोलीस कर्मचारी श्रीनगर - जम्मू हायवेवरील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी एका अज्ञात बंदुकधा-याने पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात एक पोलीस आणि 3 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून सर्व परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे. सर्च ऑपरेशनही सुरु करण्यात आलं आहे.अजूनपर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नसली तरी हिजबुल मुजाहिदिन या संघटनेवर शंका व्यक्त होत आहेत. या आठवड्यात कुलगामममध्ये बॅंक लुटण्यात आली होती त्याची जबाबदारी याच दहशतवादी संघटनेने घेतली होती.
कुलगाम येथे गेल्या सोमवारी आणि मंगळवारी 24 तासांमध्ये बॅंक लुटण्याच्या दोन घटना घडल्या होत्या. यामध्ये 5 पोलीसकर्मींसह 2 बॅंक कर्मचा-यांचाही मृत्यू झाला होता.