श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. दक्षिण काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा सेक्टरमधील लेथपोरा येथील सीआरपीएफ कॅम्पच्या कमांडो ट्रेनिंग सेंटरला दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं आहे. या हल्ल्यात 'जैश-ए- मोहम्मद'च्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा झाला असून, भारताचे 4 जवान शहीद झाले आहेत. दहशतवादी आणि जवानांमधली चकमक आता संपली आहे. मध्यरात्री 2.10 वाजता दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला केला. तर दोन महिन्यांपूर्वी दहशतवाद्यांनी असाच भ्याड हल्ला केला होता. पुलवामा जिल्ह्यात झालेल्या त्या दहशतवाद्यांसोबत चकमकीत एकूण आठ जवान शहीद झाले होते. यामधील 4 जण जम्मू-काश्मीर पोलीस दलातील असून, 4 जण सीआरपीएफचे होते. पहाटेच्या सुमारास काही दहशतवाद्यांनी जिल्हा पोलीस वसाहतीवर हल्ला केला होता. यानंतर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांकडून ऑपरेशन सुरू झालं होतं. यामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.भरती होणा-यांपेक्षा ठार होणा-या दहशतवाद्यांची संख्या जास्तजम्मू काश्मीरमध्ये गुप्तचर यंत्रणांकडून मिळत असलेल्या ठोस माहितीच्या आधारे दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत दहशतवादाचं कंबरडं मोडण्यात यश मिळालं आहे. परिस्थिती तर अशी झाली आहे की, या वर्षात जितके दहशतवादी भरती झालेले नाहीत त्यापेक्षा जास्त दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी जम्मू काश्मीरात एकूण 71 दहशतवाद्यांची भरती करण्यात आली होती. मात्र लष्कराने कारवाई करत एकूण 132 दहशतवाद्यांना ठार केलं आहे. यावर्षी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून 78 दहशतवाद्यांनी घुसखोरी केली आहे. गतवर्षी 2016 मध्ये हा आकडा एकूण 123 होता. दहशतवाद्यांची ही आकडेवारी पाहता काश्मीर खो-यातील दहशतवाद्यांच्या घुसखोरीचं प्रमाणही कमी झाल्याचंच दिसत आहे. यावर्षी लष्कराने कारवाई करत ज्या 132 दहशतवाद्यांना ठार केलं, त्यामधील 74 विदेशी तर 58 स्थानिक दहशतवादी होते. यामधील 14 लष्कर-ए-तोयबा, हिजबूल मुजाहिद्दीन आणि अल-बद्रचे टॉप कमांडर होते. राज्य पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफने केलेल्या संयुक्त कारवायांमध्ये मोठं यश हाती लागत असल्याचं दिसत आहे.