ऑनलाइन लोकमत
मथुरा, दि. २८ - लग्नामध्ये आईस्क्रीम कमी पडली म्हणून वधू आणि वर पक्षामध्ये जोरदार वादावादी झाली. या वादावादीचे पर्यावसन अखेर दगडफेकीत होऊन विवाह मोडला. उत्तरप्रदेशातील मथुरेतील महेश नगर कॉलनीमध्ये ही घटना घडली. मंगळवारी संध्याकाळी महेशनगर कॉलनीमध्ये विवाहाचा 'जयमाल सोहळा' सुरु होता.
त्यावेळी विवाहाचा आयोजक वधू पक्ष आणि वर पक्षामध्ये आईस्क्रीमच्या कमतरतेवरुन वादावादी सुरु झाली. अखेर या वादावादीचे पर्यावसन हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचले असे पोलिस अधिकारी अरुण कुमार सिंह यांनी सांगितले. वर पक्षाने या घटनेची पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तक्रारीवर कारवाई करताना वधू पक्षाच्या सात जणांना अटक केली. पोलिस कारवाईवर संतप्त झालेल्या वधू पक्षातील सदस्यांनी आणि महिलांनी पोलिसांवर दगडफेक सुरु केली आणि राया-सादाबाद रस्त्यावरील वाहतूकही रोखून धरली.
दगडफेकीमध्ये तीन पोलिस जखमी झाले. यावेळी रस्ता मोकळा करण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. दोन्ही बाजूंनी एफआयआर दाखल केला आहे. या घटनेनंतर वरपक्ष वधूला सोबत न घेताच निघून गेला.