ग्वाल्हेर: राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणावरुन काँग्रेसनं मोदी सरकारला अडचणीत आणलं असताना पहिल्यांदाच ही विमानं भारतात दाखल झाली आहेत. तीन राफेल विमानं सध्या ग्वाल्हेरच्या हवाई तळावर असून ती पुढील तीन दिवस भारतात असतील. या तीन दिवसांत भारतीय हवाई दलाचे वैमानिक राफेल विमान चालवण्याचं प्रशिक्षण घेणार आहेत. फ्रान्सच्या हवाई दलातील तीन राफेल विमानं एका आंतरराष्ट्रीय युद्धाभ्यासासाठी ऑस्ट्रेलियाला गेली होती. ही विमानं मायदेशी परतताना ग्वाल्हेरमध्ये थांबली. या युद्धाभ्यासात भारतीय हवाई दलानंही सहभाग घेतला होता. यानंतर फ्रान्सच्या हवाई दलानं राफेल विमानं भारतात उतरवली. पुढील तीन दिवस ही विमानं ग्वाल्हेरमधील हवाई दलाच्या तळावर असतील. भारतीय हवाई दलाचे वैमानिक या विमानांवर सराव करतील. तर फ्रान्सच्या हवाई दलाचे वैमानिक मिराज-2000 विमान उडवण्याचं प्रशिक्षण घेतील. ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय युद्धाभ्यासामध्ये भारतीय हवाई दलाच्या सुखोई-30 आणि वाहतूक विमानांनी सहभाग घेतला होता. या युद्धाभ्यासानंतर भारतीय हवाई दलाची विमानं माघारी परतली. यानंतर आता भारत आणि फ्रान्सचे वैमानिक ग्वाल्हेरमध्ये युद्धाभ्यास करतील. फ्रान्सच्या वैमानिकांकडून भारतीय वैमानिकांना राफेल विमान उडवण्याचं प्रशिक्षण दिलं जाईल. भारतानं फ्रान्सच्या डसॉल्ट कंपनीकडून राफेल विमानं खरेदी केली आहेत. ही विमानं लवकरच भारतात दाखल होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाचे वैमानिक राफेल विमान चालवण्याचं प्रशिक्षण घेत आहेत. सप्टेंबर 2019 पर्यंत भारतात 36 राफेल विमानं दाखल होतील, अशी आशा भारतीय हवाई दलाला आहे.
वादग्रस्त राफेल विमानं भारतात; हवाई दलाच्या वैमानिकांकडून सराव सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2018 8:41 AM