ऑनलाइन लोकमत
अब्बासपूर, दि. 15 - पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून तीन भारतीय रॉ एजंट्सला अटक केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर भारत - पाकिस्तानमधील संबंध ताणले जात असतानाच ही बातमी आली आहे. जाधव प्रकरणावरुन लक्ष भरकटवण्याच्या हेतून पाकिस्तानने हा नवा डाव खेळल्याची शक्यता आहे. दुसरीकडे भारताने कडक पाऊल उचलत पाकिस्तानसोबत सर्व द्विपक्षीय चर्चांवर स्थगिती आणली आहे.
पाकिस्तानधील वृत्तपत्र डॉनने दिलेल्या वृत्तानुसार या सर्वांवर एका पोलीस ठाण्यात स्फोट करण्यासोबत राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सामील होण्याचा आरोप आहे. खालाकोट येथे पोलिसांनी या सर्वांना तोंडावर कपडा बांधून प्रसारमाध्यमांसमोर हजर केलं. मोहम्मद खलील, इम्तियाज आणि रशीद अशी त्यांची नावे आहेत. हे सर्व अब्बासपूरच्या टरोटी गावाचे रहिवासी असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामधील दोघांचं वय 30 ते 35 तर तिस-याचं वय 20 ते 25 वर्ष असल्याचं पोलीस सांगत आहेत.
खलील हा मुख्य संशयित असल्याचं पुंछचे पोलीस उप अधीक्षक साजिद इमरान यांनी सांगितलं आहे. पाकिस्तानने केलेल्या दाव्यानुसार नोव्हेंबर 2014 मध्ये आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी तो भारतातून बंदी चेचिया गावी आला होता. येथे त्याचा संपर्क काही रॉ एजंट्सशी झाला, ज्यांनी त्याला भूलथापा देत आपल्यासोबत काम करण्यासाठी तयार केलं. खलीलला वाहतूक परवाना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. परतल्यानंतर आपल्याच गावातील इम्तियाज आणि रशीदला आपल्यासोबत काम केल्यास चांगले पैसे मिळतील सांगत तयार केलं. अब्बासपूर सेक्टरमध्ये जवळपास 14 ते 15 वेळा नियंत्रण रेषा पार केल्याची माहिती खलीलने दिल्याचं पोलीस सांगत आहेत. तसंच त्याच्या साथीदारांनी पाच ते सहा वेळा सीमारेषा पार केली आहे.
खलील आपल्यासोबत सिगारेट आणि मोबाईल सीम कार्ड ज्यामध्ये पूल, मशीद, लष्कर आणि पोलिसांशी संबंधित फोटो होते, घेऊन जात असे असं पोलीस उप अधीक्षक साजिद इमरान सांगतात. त्यांच्याकडे दोन सीम कार्ड सापडले आहेत जे त्याच्या नावे रजिस्टर होते. या सीमकार्डवरुन तो भारतीय अधिका-यांशी संपर्क साधत होता. पैशांशिवाय भारतीय मद्यदेखील तो घेऊन येत होता ज्याची विक्री तो करत असे असंही पोलीस सांगत आहेत.
गतवर्षी 27 डिसेंबर रोजी अब्बासपूर पोलीस स्थानकाच्या बाहेर झालेल्या स्फोटात यांनी आईडीचा वापर केला होता. जे त्यांनी सीमारेषेपलीकडून म्हणजेच भारतातून आणलं होतं असा दावा साजिद इमरान यांनी केली आहे. खलीलला कोणत्याही कायदा अंमलबजावणी कार्यालयाबाहेर स्फोट घडवून आणण्यासाठी पाच लाखांची ऑफर दिली गेली होती असंही अधिकारी सांगत आहेत. यामधील दीड लाख रुपये खलील तर इम्तियाज आणि रशीदला प्रत्येकी 50 हजार देण्याचं ठरवण्यात आलं होतं. भारतीय अधिका-यांना वृत्तपत्रातून त्यांच्या कामाची माहिती मिळाली. पण पैसे घेण्यासाठी पोहोचले असता त्यांना कोणीच भेटलं नाही असंही अधिका-याने सांगितलं आहे.
आपला मृत्यू झाला आहे दाखवण्यासाठी त्यांनी काही फोटो काढले होते, पण त्याआधीच त्यांची माहिती वृत्तपत्रांमध्ये आली होती. 26 सप्टेंबरला एका व्यक्तीने त्यांना पाहिल्याचं सांगितल्यानंतर पोलीस अलर्ट झाले. यानंतर आम्ही गुप्तचर यंत्रणेच्या सहाय्याने त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत त्यांना अटक केलं असं अधिका-याने सांगितलं आहे.