कोडागू (कर्नाटक) : भारतीय लष्करात एकाच वेळी लेफ्ट. जनरल या उच्च पदावर एकाच जिल्ह्यातील तीन अधिकारी सेवेत असण्याचा अनोखा मान कर्नाटकच्या कोडागू या छोट्याशा जिल्ह्याला मिळाला आहे.लेफ्ट. जनरल पत्तचेरुवंदा सी. थिमय्या, लेफ्ट. जनरल कोदंड पी. करिअप्पा आणि लेफ्ट. जनरल चेन्निरा बन्सी पोन्नप्पा हे ते तीन अधिकारी आहेत.अलीकडेच लेफ्ट. जनरल या हुद्यावर बढती मिळालेल्या कोदंड करिअप्पा यांनी मथुरा येथे ‘१ स्ट्राईक कॉर्प्स’ या लष्करातील प्रतिष्ठेच्या सैन्यदलाच्या कमांडरची सूत्रे स्वीकारली तेव्हा कॉफीच्या बागांसाठी प्रसिद्ध असलेल्या कर्नाटकातील या डोंगरदऱ्यांनी नटलेल्या निसर्गरम्य जिल्ह्यातील त्रिकुटाने नवा विक्रम नोंदविला. लेफ्ट. जनरल थिमय्या सध्या लष्करातील ‘आर्मी ट्रेनिंग कमांड’चे प्रमुख आहेत, तर लेफ्ट. जनरल पोन्नाप्पा लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रमुख आहेत. हे तिघेही खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) विद्यार्थी असून, निरनिराळ्या वेळी लष्करात दाखल झालेले आहेत. तिघांमध्ये लेफ्ट. जनरल करिअप्पा सेवेने सर्वात कनिष्ठ आहेत.देशात एकूण ७३६ जिल्हे आहेत व लष्करात लेफ्ट. जनरल हुद्याचे ९० अधिकारी आहेत. त्यापैकी एकाच वेळी तीन अधिकारी एकाच जिल्ह्यातील असावेत, ही मोठी गौरवाची बाब आहे.सुमारे चार हजार चौ. कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या कोडागू जिल्ह्याची लोकसंख्या जेमतेम ५.७२ लाख आहे व त्यात पुरुष २.३२ लाख आहेत, हे लक्षात घेता ही बाब विशेष लक्षणीय ठरते. (वृत्तसंस्था)लढवय्या योद्ध्यांचा जिल्हा१९५६ पर्यंत पूर्वीच्या कूर्ग राज्यात असलेल्या कोडागू जिल्ह्याची ओळखच लढवय्या योद्ध्यांचा जिल्हा अशी आहे. लष्कराचे पहिले भारतीय ‘कमांडर-इन-चीफ’ फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा व सहावे लष्करप्रमुख कोदंडराया थिम्मय्या हेही याच जिल्ह्याचे सुपुत्र होते.१ लष्करी वस्तुसंग्रहालयही जनरल थिम्मय्या यांच्या नावाचे उभारण्यात येत आहे. देशासाठी प्राणाहुती दिलेल्या लष्करी हुतात्म्यांचे जिल्ह्यात भव्य स्मारक आहे.१६ मेजर जनरल व हवाई दलाला चार एअर मार्शल जिल्ह्याने दिले आहे. सध्या सेवेत असलेले तीन लेफ्ट. जनरल या जिल्ह्याचे आहेत.
एका जिल्ह्याचे तीन सुपुत्र एकाच वेळी लेफ्ट. जनरल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 5:11 AM