लखनऊ, दि. 29 - बिहार, गुजरातनंतर आता उत्तरप्रदेशमध्ये राजकारणात उलथापालथ सुरु झाली आहे. समाजवादी पक्षाच्या विधानपरिषेदतील तीन आणि मायावतींच्या विधानपरिषदेतील एका सदस्याने आमदारकीचा राजीनामा दिला आहे. समाजवादी पक्षातील बुक्कल नवाब, मधुकर जेटली, यशवंत सिंह या तिघांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर चार महिन्यांनी या घडामोडी घडत आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज उत्तरप्रदेश दौ-यावर येणार आहेत. त्याआधी या राजकीय घडामोडी घडत आहेत.
राजीनामा दिल्यानंतर बुक्कल नवाबने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक करुन भाजपामध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. मार्च महिन्यात उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला होता. 403 सदस्यांच्या उत्तरप्रदेश विधानसभेत भाजपाचे 300 पेक्षा जास्त आमदार निवडून आले.
माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याबरोबर काम करु शकत नाही. पक्ष एक लढाईचा अखाडा बनला आहे असे बुक्कल नवाब यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितले. या तीन राजीनाम्यांमुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचा विधिमंडळात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आदित्यनाथ गोरखपूर येथून तर, मौर्य फुलपूरमधून लोकसभेचे खासदार आहेत.
बहुजन समाज पार्टीच्या मायावती यांनी भाजपावर कडाडून टीका केली आहे. भाजपाला सत्तेची भूक असून त्यापायी त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. मणिपूर, गोवा, बिहार, गुजरात आणि आता उत्तरप्रदेशात जे घडले त्यावरुन भाजपापासून लोकशाहीला धोका असल्याचे सिद्ध होते असे मायावती म्हणाल्या.
गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी होणा-या निवडणुकीपूर्वीच काँग्रेस पार्टीमध्ये भगदाड पडायला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत गुजरातमधील काँग्रेसच्या 6 आमदारांनी राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पार्टीला अधिक फटका बसू नये व फुटीची शक्यता ओळखून काँग्रेसनं आपल्या 44 आमदारांना विमानाने बंगळुरू येथे पाठवल्याचे वृत्त समोर आले आहे. या 40 आमदारांना राज्यसभेची निवडणूक होईपर्यंत बंगळुरूमधील एका रिसोर्टमध्ये ठेवण्यात येणार आहे. काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसमध्ये फोडाफोडीचं राजकारण करण्याचा भाजपाचा डाव यशस्वी होऊ नये, यासाठी आमदारांना बंगळुरूमध्ये पाठवण्यात आल्याचे म्हटले जात आहे.