श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील श्रीनगरपासून काही अंतरावर दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आल्याची माहिती मिळत आहे. श्रीनगरपासून काही अंतरावर असलेल्या लावापोरा भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलांनी शोधमोहीम हाती घेतली होती.
सुरक्षादलांनी हाती घेतलेल्या शोधमोहिमेदरम्यान अचानक एके ठिकाणी दहशतवाद्यांशी चकमक सुरू झाली. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. संपूर्ण रात्रभर दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू होता. या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले असून, त्यांची ओळख पटवली जात असल्याची माहिती मिळाली आहे. श्रीनगरच्या लावापोरा भागात अद्यापही शोधमोहीम सुरू असल्याचे समजते. लावापोरा येथे सुरू असलेल्या चकमकीवेळी काही युवकांना दगडफेक करण्यास सुरुवात केली. ही दगडफेक थांबवण्यासाठी काश्मीर पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, यापूर्वी २५ डिसेंबर २०२० रोजी दहशवादी आणि सुरक्षादलांमध्ये काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यातील कैगाम भागात जोरदार चकमक झाली होती. भारतीय सीमेत घुसखोरी केलेल्या तीन दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार करण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांच्या हल्ल्याला भारतीय सुरक्षादलांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला आणि भारतीय सैन्यातील दोन जवान जखमी झाले होते. यानंतर सुरक्षादलांकडून काश्मीर खोऱ्यात अलर्ट जारी करण्यात आला.