पुलवामा : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील झदुरा भागामध्ये शनिवारी पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला, तसेच सुरक्षा जवानांनी लष्कर-ए-तय्यबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.चकमकीत जखमी झालेल्या जवानाला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे तो उपचार सुरू असताना मरण पावला. प्रशांत शर्मा असे या जवानाचे नाव आहे. घटनास्थळावरुन शस्त्रास्त्रे व मोठ्या प्रमाणावर दारूगोळा जप्त केला आहे. जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफ व भारतीय लष्कराच्या जवानांनी या भागात शुक्रवारी मध्यरात्रीपासून शोधमोहीम हाती घेतली होती. जम्मू-काश्मीरमध्ये शुक्रवारी शोपियान परिसरात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले होते. यंदाच्या वर्षी जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत आतापर्यंत १५३ दहशतवादी ठार झाले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात यापुढेही आणखी कडक कारवाई करण्यात येईल असे केंद्र सरकारने म्हटले आहे.काश्मीर सीमेवर आढळले भुयारजम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्याच्या बेंगलाड भागात आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानच्या बाजूने खोदलेले एक भूयार सीमा सुरक्षा दलाने शनिवारी शोधून काढले.भारतात घुसखोरी करण्यासाठी हे भुयार खोदले गेले असावे, असा संशय असून आणखी कुठे अशी भुयारे आहेत का याचा शोध घेण्यात येत आहे.हे भूयार भारताच्या बाजूला २५ फूट खोल व १५० फूट लांब आहे. या भूयाराच्या दुसऱ्या बाजूस पाकिस्तानातील जवळची लष्कराची सीमाचौकी ४०० मीटर इतक्या अंतरावर आहे.
पुलवामामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 4:38 AM