जम्मू :जम्मू-काश्मीरमधील त्राल सेक्टर येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. ठार झालेले दहशतवादी हिज्ब या दहशतवादी संघटनेशी निगडीत होते, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली.
त्राल येथे दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. यानंतर भारतीय सेना, पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकांनी शोधमोहीम हाती घेतली. त्राल येथील एका भागाला सुरक्षा दलांनी घेराव घातला. याचदरम्यान दहशतवाद्यांकडून गोळीबाराला सुरुवात झाली.
दिल्लीतील इस्रायलच्या दुतावासाजवळ स्फोट; पोलिसांचं विशेष पथक घटनास्थळी
सुरक्षा दलांनी परिस्थिती नियंत्रणात आणून दहशतवाद्यांना शरण येण्यास सांगितले. मात्र, सुरक्षा दलांचे आवाहन न स्वीकारता दहशतवाद्यांनी गोळीबार सुरूच ठेवला. सुरक्षा दलांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.
शोधमोहीम सुरू असताना एका घरमालकाने त्यांच्या घरात दहशतवादी लपले असल्याची माहिती दिली. त्यानंतर दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन करण्यात आले होते, अशी माहिती विजय कुमार यांनी दिली. ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एक जण गतवर्षीच्या ऑगस्ट महिन्यात आणि उर्वरित दोन जण एक जानेवारी रोजी दहशतवादी संघटनेत सामील झाले होते, असेही विजय कुमार यांनी सांगितले.
चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांकडे एके-४७, पिस्तुल आणि ४ ग्रेनेड असा साठा सापडला आहे, असे विजय कुमार यांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वी दोन जानेवारी रोजी त्रालमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये एक चकमक झाली होती. या चकमकीदरम्यान दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात आठ स्थानिक आणि एक जवान जखमी झाला.