राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना तीन आठवड्यांची मुदतवाढ; निवडणूक आयोगाकडून नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 09:16 AM2023-08-17T09:16:43+5:302023-08-17T09:18:58+5:30
शरद पवार व अजित पवार गटाने निवडणूक आयोगाला सादर केलेली कागदपत्रे परस्परांनाही द्यावीत, असा आदेश आयोगाने दिला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शरद पवार गट व अजित पवार गटाला पक्षाचे नाव व निवडणूक चिन्हासंदर्भात बजावलेल्या नोटिसीवर उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोगाने आणखी तीन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे.
निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव, निवडणूक चिन्हाबाबत २७ जुलै रोजी बजावलेल्या नोटिसीवर उत्तर सादर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांनी चार आठवड्यांची मुदतवाढ मागितली होती. शरद पवार व अजित पवार गटाने निवडणूक आयोगाला सादर केलेली कागदपत्रे परस्परांनाही द्यावीत, असा आदेश आयोगाने दिला होता.
बंडखोर गटाने अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. तसा प्रस्ताव मंजूर केला आहे, अशा आशयाची प्रतिज्ञापत्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार, विधानसभेतील आमदार, विधान परिषद सदस्य, अशा ४० जणांनी निवडणूक आयोगाला सादर केली होती. यासंदर्भातील पत्र ३० जूनला निवडणूक आयोगाला पाठविण्यात आले होते. त्यानंतर दोनच दिवसांनी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड पुकारून सर्वांना चकित केले, तसेच अजित पवार व त्यांचे काही सहकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार उपमुख्यमंत्री व अन्य आठ सहकारीमंत्री झाले.