नवी दिल्ली : सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या वेतनवाढीनंतर तीन निवडणूक आयुक्तांच्या वेतनात जवळपास दोनपट वाढ झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांसह तीन निवडणूक आयुक्तांचे वेतन आता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या वेतनाइतके झाले आहे.सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या वेतनात वाढीची अधिसूचना २५ जानेवारी रोजी जारी केली होती तशीच निवडणूक आयोगासाठीही तसेच अनुसरण्यात आले, असे निवडणूक आयोगाच्या अधिका-यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तींना दरमहा २.५० लाख रूपये वेतन मिळते. तेवढे वेतन तीन निवडणूक आयुक्तांनाही दिले जाईल. सध्या ते दरमहा ९० हजार रूपये आहे. ही वेतनवाढ एक जानेवारी, २०१६ पासून लागू होईल व तिचा लाभ माजी मुख्य निवडणूक आयुक्त व निवडणूक आयुक्तांनाही होईल. निवडणूक आयोग (निवडणूक आयुक्तांच्या सेवाशर्ती व कामकाज) कायदा, १९९१ चा भाग तीननुसार मुख्य निवडणूक आयुक्तांना (आणि इतर निवडणूक आयुक्तांना) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या वेतनाइतके वेतन दिले जावे, असे म्हटले आहे.
न्यायाधीशांच्या वेतनवाढीनंतर तीन निवडणूकआयुक्तांच्या वेतनात दुपटीने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 1:57 AM