पश्चिम बंगालमध्ये तीन महिला दंडवत घालत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या महिलांनी रस्त्यावर दंडवत घातल्यानंतर टीएमसीमध्ये प्रवेश केल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणावरून वाद सुरू झाला असून पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापलं आहे. भाजपाने आरोप केला आहे की महिला भाजपामध्ये आल्या होत्या त्यानंतर टीएमसीमध्ये गेल्या. भाजपामध्ये प्रवेश केल्याची शिक्षा म्हणून टीएमसीने महिलांना दंडवत घालण्यास सांगितल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बालूरघाट येथील तपनची आहे. येथे तीन महिलांनी सुमारे एक किलोमीटरपर्यंत दंडवत घातलं. त्यानंतर टीएमसीमध्ये प्रवेश केला. रस्त्याच्या मधोमध महिला दंडवत घालत असल्याचं पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. त्याचवेळी, या प्रकरणात टीएमसीचे म्हणणे आहे की महिलांनी प्रायश्चित्त म्हणून हे केले आहे.
याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी म्हटले आहे की, या तिन्ही महिलांनी टीएमसी सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता, मात्र या तिघांनाही टीएमसीमध्ये परतायचे होते तेव्हा त्यांना दंडवत घातलं आहे. त्याचवेळी भाजपा महिला आयोगाकडे या प्रकरणाची तक्रार करण्याचा विचार करत आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार म्हणाले की, तृणमूल काँग्रेस हा नेहमीच आदिवासी विरोधी पक्ष राहिला आहे. तृणमूल काँग्रेसने या तीन आदिवासी महिलांशी जे केले ते आदिवासींचा अपमान आहे. मी आदिवासी समाजाला या प्रकरणाबाबत तृणमूल काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करण्याचे आवाहन करतो. तृणमूल काँग्रेसने आदिवासी महिलांशी जे केले, त्याचा बदला आदिवासी समाजाने लोकशाही मार्गाने घेतला पाहिजे. याआधीही तृणमूल काँग्रेसने द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती होण्यास विरोध केला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"