नवी दिल्ली - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिम पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांच्या बाजूने एक कायदा बनवण्याची मागणी केली आहे. भारतीय मुस्लिमांना पाकिस्तानी संबोधणा-यांना तीन वर्षाच्या कारावासाची शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. केंद्र सरकारने या मुद्द्यावर एक विधेयक आणावं असं त्यांनी म्हटलं आहे.
लोकसभेत बोलताना असदुद्दीन ओवेसी बोलले की, 'असा कायदा आणला गेला पाहिजे ज्यामध्ये कोणत्याही भारतीय मुस्लिमाला पाकिस्तानी संबोधल्यास तीन वर्षाच्या कारावासाची शिक्षेची तरतूद असावी. पण केंद्रातील भाजपा सरकार असं कोणतंही विधेयक आणणार नाही'. पुढे ते बोललेत की, 'भारतात जे मुस्लिम आहेत त्यांनी मोहम्मद अली जिन्ना यांच्या दोन राष्ट्रांचा सिद्धांत नाकारला आहे. पण आजही भारतीय मुस्लिमांना बाहेरचं समजलं जातं'.
असदुद्दीन ओवेसी यांनी काही दिवसांपुर्वी हरियाणामधील काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यावर निशाणा साधला होता. खट्टर सरकार आपली जबाबदारी निभावण्यात अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली होती. राज्य सरकार लोकांना सुरक्षादेखील पुरवू शकत नसल्याचं ते बोलले होते.
त्यावेळी असदुद्दीन ओवेसी पुढे बोलले होते की, 'विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा मी निषेध करतो. काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे आणि तो नेहमी राहणार. अशा परिस्थितीत आपण काश्मिरी लोकांना काय संदेश देत आहोत ? त्यांच्यावर हल्ला करणारे लोक कोण आहेत ? हरियाणा सरकार सुरक्षा पुरवण्याच्या जागी एका वेगळ्या विचारसरणीवर काम करत आहे'.