हृदयद्रावक! ३ वर्षांच्या मुलीचा वाढदिवसाच्या एक दिवस आधीच बोअरवेलमध्ये पडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 11:47 AM2024-07-30T11:47:57+5:302024-07-30T11:49:02+5:30
बोअरवेलमध्ये पडून तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मध्य प्रदेशातील सिंगरौली येथे बोअरवेलमध्ये पडून तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी सिंगरौली जिल्ह्यातील एका गावाजवळील बोअरवेलमध्ये पडल्याने तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.
रिपोर्टनुसार, बरगंवा पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर शिवपूजन मिश्रा यांनी सांगितलं की, पिंटू साहू यांची मुलगी शौम्या जिल्हा मुख्यालयापासून ४० किमी अंतरावर असलेल्या कसार गावाजवळील शेतात खेळत असताना संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बोअरवेलमध्ये पडली.
बोअरवेल २५० फुटांपेक्षा जास्त खोल असून मुलगी 25 फूट खोलवर अडकल्याचं सांगितलं. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बचाव कर्मचाऱ्यांनी तातडीने मुलीला बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सुरू केलं आणि साडेपाच तासांच्या संघर्षानंतर तिला बाहेर काढण्यात यश आलं आहे.
जिल्हा मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी एनके जैन यांनी सांगितलं की, मुलीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं, पण तपासणीनंतर मृत घोषित करण्यात आलं. बोअरवेलमध्ये पडून मृत्यू झालेल्या मुलीचा आज वाढदिवस असल्याचं सांगण्यात येत आहे. मुलीच्या मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
याआधीही मध्य प्रदेशात बोअरवेलमध्ये मुलं पडण्याच्या घटना समोर आल्या आहेत. एप्रिलमध्ये सहा वर्षांचा मयंक रेवा येथे शेतात खेळत असताना बोअरवेलमध्ये पडला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी ४० तास सतत रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं पण तरीही त्याचा जीव वाचू शकला नाही.