नवी दिल्ली, दि. 4 - मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनसाठी रवाना झाले आहेत. चीनमध्ये यावर्षी ब्रिक्स परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जीनपींग यांच्या भेटीकडे जगाचं लक्ष लागलं आहे. डोकलाम सीमाप्रश्नावरून भारत-चीनमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्व आहे. नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान बनले.
नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणाशी संबंधित निर्णयांमुळे जागतिक व्यासपीठावर जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताची खरी क्षमता आणि भूमिका समोर आली आहे. त्यांनी सार्क देशांच्या सर्व राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत आपल्या कार्यकाळाची सुरुवात केली. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत त्यांनी केलेल्या भाषणाची जगभरात प्रशंसा झाली. नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांनी 17 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर नेपाळचा, 28 वर्षांनंतर ऑट्रेलियाचा, 31 वर्षांनंतर फिजीचा आणि 34 वर्षांनंतर सेशेल्सचा द्विपक्षीय दौरा केला. पदभार स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्र, ब्रिक्स, सार्क आणि जी-20 शिखर परिषदेला उपस्थित राहिले, जिथे विविध जागतिक, आर्थिक आणि राजकीय मुद्यांवरील भारताच्या भूमिकेची आणि मतांची व्यापक प्रमाणात प्रशंसा झाली. त्यांच्या जपान दौऱ्यामुळे भारत-जपान संबंधांचे नवीन पर्व सुरू झाले. मंगोलियाला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान बनले आणि त्यांचा चीन आणि दक्षिण कोरियाचा दौरा भारतात गुंतवणूक आकर्षित करण्यात यशस्वी ठरला. त्यांच्या फ्रान्स आणि जर्मनी दौऱ्यादरम्यान युरोपबरोबर त्यांची सातत्यपूर्ण चर्चा सुरू असल्याचे जाणवले.
अरब राष्ट्रांशी भारताचे संबंध अधिक दृढ करण्यावर मोदी यांनी भर दिला आहे. ऑगस्ट 2015 मध्ये त्यांनी आखाती देशांचा दौरा केला. आखाती देशात 34 वर्षांत दौरा करणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले. आखाती देशांशी आर्थिक संबंध बळकट करण्यावर त्यांनी या दौऱ्यात भर दिला. जुलै 2015 मध्ये मोदी यांनी पाच मध्य आशियाई देशांचा दौरा केला. त्यांचा हा दौरा अनेक दृष्टीनं पथदर्शी मानला जातो. ऊर्जा, व्यापार, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रांशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण करारांवर या दौऱ्यादरम्यान स्वाक्षऱ्या झाल्या.ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अबॉट, चीनचे राष्ट्रपती शि जिनपिंग, श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह जगातील अनेक नेत्यांनी मोदी यांच्या पंतप्रधान कार्यकाळात भारताचा दौरा केला आणि त्यांच्या या दौऱ्यामुळे या सर्व देशांबरोबर भारताचे सहकार्य सुधारण्यास मदत झाली. भारत आणि अमेरिका संबंधांच्या इतिहासात प्रथमच 2015 च्या प्रजासत्ताक दिनाला राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले.
पंतप्रधानपदी विराजमान होताच मोदींनी आंतरराष्ट्ररीय संबंधांवर जास्त भर दिला. मोदींनी सलग अनेक देशांचे दौरे केले. काही दिवसांपूर्वीच मोदींनी इस्रायल दौरा केला, जो भारतीय पंतप्रधानाचा पहिलाच दौरा होता. मोदींच्या परदेश दौऱ्यावर अनेकदा टीका करण्यात येते. मोदी भारतात कमी आणि परदेशात जास्त असतात, अशी टीकाही विरोधकांकडून केली जाते. मात्र मोदी कोणत्या देशात किती वेळा गेले असतील हे पाहायचं असेल तर ते एका क्लिकवर पाहू शकता. गुगल मॅपवर मोदींचे परदेश दौरे देण्यात आले आहेत. या मॅपवर क्लिक करुन तुम्ही मोदींचे परदेश दौरे पाहू शकता.