पटणा - बिहारमध्ये पुन्हा एकदा जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) च्या छात्रसंघाचे माजी अध्यक्ष आणि माकपचे नेते कन्हैया कुमार यांना विरोधाचा सामना करावा लागला आहे. कन्हैया यांची जन गण मन यात्रा लखीसराय येथे पोहचल्यानंतर कन्हैयाच्या सभेदरम्यान मंचावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला. चप्पल स्टेजवर पोहोचली नाही. दरम्यान, कार्यकर्त्यांनी आरोपी युवकाला पकडून जोरदार मारहाण केली.
कन्हैया कुमार यांच्या बिहार येथील यात्रेवर आतापर्यंत 8 वेळा दगडफेक करण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्हैया आपल्या पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार गांधी मैदान येथे आयोजित मेळाव्याला संबोधित करताना प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका तरूणाने मंचावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला. पण ही चप्पल स्टेजपर्यंत पोहचू शकत नाही. मात्र यावेळी काही कार्यकर्त्यांनी आरोपी तरूणाला पकडून जोरदार मारहाण केली. बऱ्याच प्रयत्नानंतर पोलिसांनी जमावापासून तरूणांना वाचवले आणि ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. कन्हैया कुमार यांच्या दिशेने चप्पल फेकणाऱ्या युवकाचे नाव चंदन कुमार असे आहे.
आरामध्येही यात्रेवर दगडफेक चंदनने सांगितले की, कन्हैया कुमार यांना देशात दंगल भडकवायची आहे. डाव्यांची विचारसरणी कधीही चालणार नाही असं सांगत मी देशभक्त आहे असं तो म्हणाला. याआधी शुक्रवारी कन्हैयाच्या ताफ्यावरही आरा येथे दगडफेक करण्यात आली होती, त्यात अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे.
कन्हैया कुमार बिहारमध्ये घेणार 50 सभा एनआरसी आणि सीएएविरोधात कन्हैयाने 'जन-गण-मन' यात्रा काढली आहे. एका महिन्याच्या या कालावधीत ते बिहारमधील बहुतेक सर्व प्रमुख शहरांमध्ये भेट देणार आहे. सुमारे 50 सभा बिहारमध्ये होणार आहे. कन्हैयाने 30 जानेवारी रोजी बेतियाहून हा यात्रेला सुरुवात केली. 29 फेब्रुवारीला त्यांची यात्रा संपणार आहे. यापूर्वी कन्हैयाच्या ताफ्यावर जमुई, सुपौल, कटिहारसह अनेक भागात हल्ला झाला आहे.