नवी दिल्ली : जहांगीरपुरीत शनिवारी शोभायात्रेवर झालेल्या दगडफेकीनंतर सोमवारी पुन्हा या परिसरात तणाव निर्माण झाला. एका आरोपीच्या घराकडे जात असलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रेम शर्मा यांना दिल्लीपोलिसांनी अटक केली आहे.
हनुमान जयंतीनिमित्त शोभायात्रा जात असताना अचानकपणे दगडफेक करण्यात आली. यात पोलिसांसह काही जण जखमी झाले होते. यानंतर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणी सोनू चिकना याने गोळीबार केल्याचा आरोप आहे. या आरोपीच्या घराची झडती घेण्यासाठी सोमवारी दुपारी गुन्हे शाखेचे पथक जात असताना अचानकपणे वरच्या मजल्यावरून पथकावर दगडफेक सुरू झाली. यामुळे या परिसरात पुन्हा तणाव निर्माण झाला.
शनिवारी हनुमान जयंतीला कोणतीही पूर्वपरवानगी न घेता शोभायात्रा काढल्याच्या आरोपाखाली विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) नेते प्रेम शर्मा यांना पोलिसांनी सायंकाळी अटक केली. विहिंप व बजरंग दलाच्या नेत्यांविरोधात गुन्हे दाखल केले.
कारवाईत भेदभाव नाही - अस्थानाजहांगीरपुरी प्रकरणाच्या चौकशीत धार्मिक भेदभाव केला जात नसल्याचा खुलासा दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी केला आहे. या प्रकरणी आतापर्यंत २३ जणांना अटक करण्यात आली असून, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी १४ पथक तयार केल्याचे त्यांनी सांगितले.
आप-भाजपचे एकमेकांवर आरोपदिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी आम आदमी पक्षाने रोहिंग्या व बांगलादेशी नागरिकांना दिलेल्या आश्रयामुळे दंगल झाल्याचा आरोप केला, तर आपचे नेते अमानउल्लाह खान यांनी एका धर्माला लक्ष्य केल्याचा आरोप केला.
मार्टिना नवरातिलोव्हाचेही ट्विटप्रसिद्ध टेनिस खेळाडू मार्टिना नवरातिलोव्हा यांनी ट्विट करून या प्रकणात उडी घेतली आहे. पत्रकार राणा अयूब यांचे ट्विट रिट्विट करीत मार्टिना नवरातिलोव्हा यांनी मोदी सरकारवर या प्रकरणाचे खापर फोडले आहे.