ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - दिल्ली विमातळावर प्रवाशांनी बुधवारी बर्निंग फ्लाईटचा थरार अनुभवला. विमानाने उड्डाण केल्यानंतर आकाशामध्ये पोहोचल्यानंतर काही वेळातच मागच्या बाजूला आग लागली. ही आग इतकी मोठी होती की खाली उभ्या असलेल्या लोकांनाही ती स्पष्ट दिसत होती. द्वारका परिसरातील दोन तरुणांनी पीसीआरला फोन करुन ही माहिती दिली. तिथून वैमानिकानेही इमर्जन्सी लँडिंगचा संदेश पाठवला. या परिस्थितीत इमर्जन्सी घोषित करत विमानाला परत बोलावून दिल्ली विमानतळावर लँड करण्यात आलं. या विमानात एकूण 193 प्रवासी प्रवास करत होते.
हे गो एअरवेजचं विमान होतं. एक महिन्यापुर्वीदेखील याच विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं. विमानाचं उड्डाण होण्याआधी इंजिनिअरिंग टीम संपुर्ण तपासणी करतं. त्यांनी मंजूरी दिल्यानंतरच विमानाच्या उड्डाणाला परवानगी दिली जाते. पण या यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
'संध्याकाळी 7 वाजून 21 मिनिटांनी विमानाने उड्डाण केलं. काही वेळानंतर दिल्ली पोलिसांच्या कंट्रोल रुममधून काही लोकांनी एका विमानाला आग लागली असल्याचं पाहिलं असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर लगेचच संबंधित विभागांना अलर्ट देण्यात आलाट, अशी माहिती डीसीपी संजय भाटिया यांनी दिली आहे.
विमानाला परत बोलावून 7 वाजून 47 मिनिटांनी लँडिंग करण्यात आलं. संबंधित विभाग आग लागण्यामागचं कारण तपासत आहेत. इंजिनमध्ये बिघाड झाल्याने आगा लागल्याचा प्राथमिक अंदाज सीआयएसएफने दर्शवला आहे.