धर्मपुरी - सुपरस्टार रजनीकांत राजकारणात केव्हा प्रवेश करणार, याची उत्सुकता सर्वांना असतानाच रजनीकांत यांच्या भावाने म्हणजे सत्यनारायण राव गायकवाड यांनी याविषयीचा एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. रजनीकांत आपल्या राजकारणातील प्रवेशाची आणि राजकीय पक्षाची घोषणा जानेवारी महिन्यात करणार असल्याचे सत्यनारायण यांनी सांगितले. धर्मपुरी येथे बोलताना त्यांनी याविषयीची घोषणा केली. त्यामुळे रजनीकांत यांना राजकारणातील प्रवेशाविषयीच्या बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्याचे म्हटले जात आहे. अर्थात रजनीकांत कोणता निर्णय घेतो, याकडे त्याच्या लाखो चाहत्यांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर रजनीकांत यांचे बंधू सत्यनारायण राव यांनी नव्याने माहिती देत हा मुहूर्त जानेवारीत असल्याचे सांगितल्याने उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे.
रजनीकांत यांच्या दक्षिणेतील कमालीच्या लोकप्रियतेमुळे त्यांच्या राजकारणातील प्रवेशाचे भाकीत वारंवार वर्तवण्यात येत असते. गेल्या काही महिन्यांपासून राजकीय पटलावर सुरु असणाऱ्या हालचाली आणि रजनीकांत यांनी काही सभा, कार्यक्रमांमध्ये केलेली वक्तव्ये पाहता त्यांचा राजकारणातील प्रवेश अनेकांनाच अपेक्षित होता. पण, ते नेमके कोणत्या पक्षातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार हे स्पष्ट होत नव्हते. पण, आता जानेवारी महिन्यात रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
मागच्या चार दशकातील तामिळनाडूचा इतिहास बघितला तर, लोकप्रिय व्यक्तींनीच इथले सत्ता सिंहासन संभाळले आहे. दिवगंत मुख्यमंत्री जयललिता यांचे अकाली निधन आणि वृद्धापकाळाने राजकारणात सक्रीय नसलेले करुणानिधी यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरुन काढण्याची क्षमता रजनीकांत यांच्यामध्ये आहे. त्यामुळे रजनी यांचे असंख्य चाहते त्यांच्या राजकीय प्रवेशाची वाट पाहत आहेत.
राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी सुपरस्टार रजनीकांत 2.0 आणि काला या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. पण, त्यानंतर त्यांच्या हाती कोणतेच प्रोजेक्ट नसल्याचेही म्हटले जातेय. तेव्हा आता चित्रपटांना रामराम ठोकून सुपरस्टार रजनीकांत नव्या इनिंगची सुरुवात नेमकी कोणत्या मुहूर्तावर करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.