नवी दिल्ली : डिजिटल व्यवहार सुलभ करण्यासाठी भारतीय राज्यघटनेचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने नवीन अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून केवळ अंगठ्याद्वारे लोकांना पेमेंट करता येईल. त्यामुळे यापुढे आपला अंगठाच आपली बँक बनणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. डिजिटल पेमेंट करणाऱ्यांना लकी ड्रॉमार्फत बक्षिसे देण्याची योजनाही त्यांनी जाहीर केली.एके काळी निरक्षरांना अंगठेबहाद्दर म्हणून ओळखले जात असे. मात्र आता अंगठा हीच आपली केवळ ओळखच नव्हे, तर बँकही बनणार आहे. येत्या काळात भीमअॅप जगात आश्चर्य म्हणून ओळखले जाईल. देशात निराशावादी लोकांची कमी नाही. निराशावादी लोकांसाठी माझ्याकडे औषध नाही. मात्र आशावादी लोकांसाठी माझ्याकडे खूप संधी आहेत, असे सांगून मोदी म्हणाले की, यापूर्वी २जी मध्ये इतके कोटी गेले, कोळशात तितके कोटी गेले, याची चर्चा होत असे. नोटाबंदीनंतर आता काल किती पैसे जमा झाले, आज किती जमा झाले, याची चर्चा होत आहे. नोटाबंदी, डिजिटल पेमेंट आदी विषयांवर टीका करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावरही मोदींनी नाव न घेता टीका केली. मोदी यांनी डोंगर पोखरून उंदीर काढला, असे एक नेता म्हणाला होता, याचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की, असे उंदीरच शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान करतात. मला अर्थव्यवस्थेतील उंदरांनाच बाहेर काढायचे होते. आर्थिक आणि भौतिक सुबत्तेमुळे एकेकाळी देशाला सोने की चिडिया म्हटले जायचे. आजही या देशामध्ये 'सोने की चिडिया' बनण्याची क्षमता आहे, असे सांगून नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशातील नागरिकांनी एकजूट दाखवली. देशाची खरी ताकद दिसली, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे, असे सांगून ते मोदी म्हणाले. भीम अॅपच्या रूपात मी तुम्हाला नववषार्ची सर्वोत्तम भेट देत आहे. नव्या वर्षात प्रत्येकाने किमान पाच वेळा डिजिटल पेमेंट करावे. (लोकमत न्यूज नेटवर्क)- डिजी धन मेळाव्यामध्येच मोदी यांनी भीम हे नवीन मोबाइल अॅप सुरू केले. भीमअॅपमुळे डिजिटल पेमेंट करणे अधिक सोपे होणार आहे. या अॅपच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या तंत्रज्ञानातून केवळ अंगठ्याच्या माध्यमातून पेमेंट करता येईल.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
अंगठाच होईल आपली बँक
By admin | Published: December 31, 2016 5:04 AM