नवी दिल्ली - देशातील काही भागात पावसाने थैमान घातले आहे. बिहारमध्ये गुरुवारी वादळी पावसाने कहर केला आहे. बिहारच्या अनेक भागांमध्ये गुरुवारी 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने वादळ आलं आणि त्यानंतर काही वेळाने हलका आणि जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी गाराही पडल्या. यादरम्यान राज्यात विविध घटनांमध्ये 25 जणांचा मृत्यू झाला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच दरम्यान पाच बोटी बुडाल्याची देखील माहिती मिळत आहे.
मृतांमध्ये मुझफ्फरपूरमधील पाच, भागलपूरमधील चार, लखीसराय-सारणमधील प्रत्येकी तीन, मुंगेरमधील दोन आणि जमुई, बांका, बेगुसराय, खगडिया, पूर्णिया, नालंदा, जेहानाबाद आणि अररिया येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. यावेळी अनेक ठिकाणी कच्ची घरे आणि झाडे उन्मळून पडली. त्यामुळे वाहतुकीसह वीजपुरवठ्यावर परिणाम झाला. वादळामुळे आंबा, लिची, मका, मूग, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याचवेळी पाटण्यातील मणेर येथे वाळू वाहून नेणाऱ्या पाच बोटी गंगेत बुडाल्या.
पाच बोटीत जवळपास 50 मजूर होते. त्यांनी पोहून आपला जीव वाचवला आहे. हवामानशास्त्रज्ञांच्या मते, वातावरणातील आर्द्रता-समृद्ध हवेचा प्रवाह, तापमानात झालेली वाढ आणि मध्य बिहारमधून ट्रफ लाइन गेल्यामुळे वादळ आणि पाऊस झाला आहे. राज्यात आता मान्सूनपूर्व हालचाली सक्रिय झाल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पूर्वेकडील प्रवाहामुळे वातावरणातील खालच्या पातळीवर आर्द्रतेच्या प्रमाणात वाढ नोंदविण्यात आली होती.
हवामान खात्याने जारी केला येलो अलर्ट
हवामान शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, पूर्व पश्चिम ट्रफ मध्य बिहारमधून उत्तर पश्चिम उत्तर प्रदेशातून उप हिमालयीन पश्चिम बंगालकडे जात आहे. या प्रभावामुळे राज्यात पुढील 24 तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये गडगडाट आणि हलक्या पावसाचा अंदाज आहे. या सर्व हवामानाचा परिणाम लक्षात घेता, पाटणा हवामान केंद्राने यलो अलर्ट जारी करताना लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा इशारा दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.