कोलकाता : तिबेटला चीनपासून स्वातंत्र्य नव्हे तर अधिक विकास हवा आहे, असे प्रतिपादन गेली ५० वर्षे भारतात विजनवासात राहणारे तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांनी गुरुवारी येथे केले. इंडियन चेंबर आॅफ कॉमर्सच्या कार्यक्रमात श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना दलाई लामा म्हणाले की, अधूनमधून भांडणे झाली असली तरी तिबेट व चीन यांचे घनिष्ट संबंध आहेत. त्यामुळे भूतकाळात काय घडले ते बाजूला ठेवून भविष्याचा विचार करायला हवा.आम्हाला स्वातंत्र्य नको, पण चीनने तिबेटचा आदर करायला हवा, यावर भर देत दलाई लामा म्हणाले की, तिबेटची वेगळी संस्कृती आहे, वेगळी भाषा आहे. त्याचा चीनने आदर ठेवायला हवा. चिनी लोकांचे जसे त्यांच्या देशावर प्रेम आहे तसे आमचे आमच्या देशावर प्रेम आहे.तिबेटचे पठार हे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचे व अद्वितीय आहे. त्यामुळे त्याचे जतन करणे अगत्याचे आहे, असे मतही दलाई लामा यांनी व्यक्त केले.>‘हिंदी, चिनी भाई भाई’राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अरुणाचल प्रदेश भेटीला चीनने आक्षेप घेतल्याबद्दल पत्रकारांनी विचारता दलाई लामा म्हणाले की, भारत व चीन यांचे संबंध ‘हिंदी चिनी भाई भाई’ या भावनेनेच पुढे नेले जाऊ शकतील. दोन्ही देशांना शेजारी म्हणूनच यापुढेही राहायचे आहे. त्यामुळे शांतता व सहकार्याने राहणे हाय स्थायी मार्ग आहे.
तिबेटला स्वातंत्र्य नको, विकास हवा, दलाई लामांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 4:15 AM