ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24- लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या प्रवासासाठी ‘आधी तिकिट काढा, पैसे नंतर द्या’ अशी नवी सेवा सुरु करण्याचं रेल्वेनं ठरविलं होतं. त्यानूसार आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर आता प्रवाशांना क्रेडिटवर तिकिट मिळणार आहे. डिजिटल पेमेंट स्विकार करणारी ही पहिली सरकारी वेबसाइट आता पूर्णपणे कॅशलेस झाली आहे. जून महिन्याच्या सुरूवातीला रेल्वेकडून नव्या सुविधेविषयी माहिती देण्यात आली होती. या सुविधेत प्रवासाच्या पाच दिवस आधी तिकिट बुकिंग केल्यानंतर त्या तिकिटाचे पैसे 14 दिवसानंतर देता येणार आहेत. या सेवेसाठी प्रवाशाकडून ३.५ टक्के सेवाकर घेतला जाईल. या सुविधेसाठी आयआरसीटीसीने मुंबईतील ‘ई-पेलॅटर’ या कंपनीशी सहकार्य करार केला आहे. मुंबई मिरर या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.
आयआरसीटीसीच्या या सुविधेमुळे तिकिट बुकिंगच्या वेळी तात्काळ पैसे देण्याची प्रवाशांना आता काळजी करावी लागणार नाही. आत्तापर्यंत पन्नास लोकांनी कॅशलेस तिकिट बुकिंगच्या या योजनेचा फायदा घेतला असल्याची माहिती आयआरसीटीसीचे प्रवक्ते संदिप दत्ता यांनी मुंबई मिरर या वृत्तपत्राला दिली आहे. जर 14 दिवसांनंतर प्रवाशांनी तिकिटाचे पैसे भरले नाहीत तर त्यांना दंड आकारला जाणार आहे. तसंच जो प्रवासी दरवेळी पैसे भरायला टाळाटाळ करेल, त्याला कायमस्वरूपी आयआरसीटीसीच्या या सेवेपासून वंचित राहावं लागणार आहे.
आयआरसीटीसीवरून तिकिट बूक करणाऱ्या कोणत्या ग्राहकाला किती रूपयांपर्यतचं तिकिट क्रेडिटवर दिलं जाइल याचा निर्णय पूर्णपणे ई-पेलॅटरकडून घेतला जाणार आहे. ग्राहकाची क्रेडिट हिस्ट्री, डिजीटल फुटप्रिंट, डिवाइस इन्फॉर्मेशन आणि ऑनलाइन खरेदीच्या पॅटर्नवर इ-पेलॅटर निर्णय घेणार आहे. एखाद्या ग्राहकास क्रेडिट कार्ड देताना ‘सिबिल’कडून जशी त्याची पत पडताळणी केली जाते तीच पद्धत यासाठी अवलंबिली जाणार आहे. ज्यांना या सेवेचा लाभ घ्यायचा असेल त्यांना नाव, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर, पॅन कार्ड किंवा आधार क्रमांक अशी माहिती द्यावी लागणार आहे. तसंच पत पडताळणी करून ग्राहकास ही सेवा वापरण्याची मुभा मिळाली की त्याला ‘ओटीपी’ (वन टाइम पासवर्ड) पाठविला जाईल व तो वापरून त्यास पुढील व्यवहार करता येईल.