Tiger Attack : गेल्या पाच वर्षांत देशभरात वाघांच्या हल्ल्यात ३०२ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र यापैकी ५५ टक्क्यांहून अधिक मृत्यू एकाच राज्यातील असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या सरकारी आकडेवारीतून ही माहिती मिळाली आहे. आकडेवारीनुसार, केंद्राने पीडितांच्या कुटुंबीयांना 29.57 कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून वितरित केले आहेत. सरकारने या आठवड्याच्या सुरुवातीला लोकसभेला सांगितले की 2022 मध्ये वाघांच्या हल्ल्यात 112 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 2021 मध्ये 59, 2020 मध्ये 51, 2019 मध्ये 49 आणि 2018 मध्ये 31 लोक मारले गेले होते.
सर्वाधिक आकडा महाराष्ट्रात; गेल्या 5 वर्षात 170 बळी
गेल्या ५ वर्षांच्या कालावधीत वाघांच्या हल्ल्यात एकट्या महाराष्ट्रात १७० मृत्यूची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात 2022 मध्ये वाघांच्या हल्ल्यात 85, 2021 मध्ये 32, 2020 मध्ये 25, 2019 मध्ये 26 आणि 2018 मध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशात गेल्या पाच वर्षांत वाघांच्या हल्ल्यात ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये 2022 आणि 2021 मध्ये प्रत्येकी 11, 2020 मध्ये चार, 2019 मध्ये आठ आणि 2018 मध्ये पाच जणांचा वाघांच्या हल्ल्यामुळे मृत्यू झाला.
बंगालमध्ये आकडा कमी, बिहारमध्ये मृत्यूच्या प्रमाणात वाढ
पश्चिम बंगालमध्ये गेल्या पाच वर्षांत वाघांच्या हल्ल्यात २९ जणांचा मृत्यू झाला आहे, मात्र गेल्या काही वर्षांत ही संख्या सातत्याने कमी होत आहे. पश्चिम बंगालमध्ये 2018 मध्ये वाघांच्या हल्ल्यात 15 लोकांचा मृत्यू झाला होता, परंतु 2022 मध्ये ही संख्या केवळ एकावर आली आहे. बिहारमध्ये मात्र वाघांच्या हल्ल्यांशी संबंधित मृत्यूंमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. बिहारमध्ये 2019 मध्ये वाघाच्या हल्ल्यात कोणीही मरण पावले नाही, परंतु 2020 मध्ये एका व्यक्तीला, 2021 मध्ये चार आणि 2022 मध्ये नऊ जणांना वाघाच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला आहे.
राज्य - मृत्यू (२०२२) - मृत्यू (२०२१)
- महाराष्ट्र - ८५ - ३२
- उत्तर प्रदेश - ११ - ११
- पश्चिम बंगाल- १ - १५ (वर्ष २०१८)
- बिहार - ९ - ४