उत्तर प्रदेशच्या पीलीभीत एक ह्दयद्रावक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका वाघाने दुचाकीवरून जाणाऱ्या ३ युवकांवर हल्ला केला आहे. ज्यात २ युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिसऱ्याने कसाबसा स्वत:चा जीव वाचवला आहे. पोलिसांनी २ मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवले आहेत. तर एकाची अवस्था ठीक आहे
पीलीभीतच्या दियूरिया कला येथे राहणारे ३ युवक रात्रीच्या वेळी बाईकवरून प्रवास करत होते. त्यावेळी जंगलाच्या रस्त्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने या तिघांवर हल्ला केला. यात २ युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर तिसरा जखमी अवस्थेत एका झाडावर चढला त्यामुळे त्याचा जीव वाचला. या घटनेबाबत गावात बातमी पसरल्यानंतर कुटुंबावर शोककळा पसरली. झाडावर चढलेल्या युवकाने सांगितले की, आम्ही तिघं घरच्या दिशेने येत होतो. तेव्हा रस्त्यात जंगल येते. त्याठिकाणी वाघाने अचानक हल्ला केला. हल्ल्यानंतर वाघाने दोघांनाही जंगलात नेले. मी झाडावर चढून बसलो होतो. त्यामुळे माझा जीव वाचला. सकाळी जेव्हा लोकांनी मला पाहिल्यानंतर खाली उतरवलं.
या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी वनविभागाच्या सहाय्याने जंगलात शोधमोहिम सुरू केली. जंगलात पुढे गेल्यानंतर एकाचा मृत्यू अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळला. तर दुसरीकडे सोनूचा मृतदेह काही अंतरावर सापडला. हे तिघं शाहजहांपूर येथे नातेवाईकांच्या घरी गेले होते. तिथून परतताना वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेनंतर परिसरातील लोकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. वनविभागाच्या टीमने वाघाला पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
पीलीभीत जिल्ह्यात वाघाने हल्ला केल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अनेकदा वाघाने लोकांवर हल्ले केले आहेत. वन्यप्राण्यांनी आतापर्यंत केलेल्या हल्ल्यात अनेक लोकांचे जीव गेले आहेत. या हल्ल्याबाबत पोलीस अधीक्षक किरीट राठोड म्हणाले की, वाघाने तीन युवकांवर हल्ला केला आहे. ज्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एका व्यक्तीने प्रसंगावधना राखत त्याचा जीव वाचवला आहे. दोघांचे मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवले आहेत. या घटनेचा आणखी तपास केला जात आहे. तर घटनास्थळापासून आजूबाजूला २० कॅमेरा लावण्यात आले आहेत. अलर्ट जारी केला आहे. लोकांनी या रोडने एकट्याने जाऊ नये असं वनविभागाने आवाहन केले आहे.