'वाघाने जबड्यात डोके पकडले, मी त्याची जीभ ओढली अन्...', 17 वर्षीय मुलाची मृत्यूवर मात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 10:10 PM2024-03-13T22:10:27+5:302024-03-13T22:11:20+5:30
शाळेतून घरी परतणाऱ्या मुलांवर वाघाचा हल्ला, 17 वर्षीय अंकितने दाखवले शौर्य.
Tiger Attack: वाघाने हल्ल्या केल्याच्या अनेक घटना तुम्ही वाचल्या किंवा ऐकल्या असतील. वाघाच्या हल्ल्यातून एखाद्याचा जीव वाचणे चमत्कारापेक्षा कमी नाही. उत्तराखंडमधील एका 17 वर्षीय मुलासोबत असाच चमत्कार घडला. रामनगर येथे राहणारा अंकित त्याच्या मित्रांसोबत शाळेतून घरी येत होता. यावेळी अचानक एका वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. अंकितने आपल्या मित्रांचे प्राण तर वाचवलेच, पण स्वतः वाघाच्या तावडीत सापडला.
मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2023 मध्ये ही धक्कादायक घटना घडली. अंकित आपल्या मित्रांसोबत दुपारी शाळेतून घरी परतत होता. यावेळी अचानक झाडावर बसलेल्या वाघाने मागून हल्ला केला. वाघाने अंकितडे डोके आपल्या जबड्यात पकडले. बराचवेळ त्यांच्यात झटापट झाली. वाघ अंकितचे डोके सोडायला तयार नव्हता, अंकितही हार मानत नव्हता. अखेर थोड्यावेळाने वाघाची पकड सैल झाली आणि त्याच क्षणी अंकितने वाघाची जीभ पकडून बाहेर काढली. यानंतर वाघाने घाबरुन तेथून पळ काढला.
या धक्कादायक घटनेत अंकितचा जीव वाचला, पण त्याच्या डोक्याचा मोठा भाग वाघाने सोलून काढला होता. या हल्ल्यात त्याचा चेहरा, मान, कवटी आणि उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. यानंतर अंकितच्या मित्रांनी त्याला जवळच्या वैद्यकीय केंद्रात नेले. पण जखमा मोठ्या असल्यामुळे त्याला प्राथमिक उपचारानंतर गुरुग्राम येथील मणिपाल हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले. तिथे डॉ.आशिष धिंग्रा यांच्या देखरेखीखाली अंकितची प्लास्टिक सर्जरी झाली.
अंकितची अवस्था पाहून डॉक्टरही थक्क झाले होते. अंकितच्या डोक्याचे कातडे ओरबाडून निघाले, कवटीचे हाड बाहेर आले, उजवा कान कापला गेला, चेहऱ्यावर वाघाचे दात घुसले, उजव्या हाताचा अंगठादेखील तुटला होता. सूमारे 4 महिन्यांच्या उपचारानंतर अंकित बरा झाला. त्याच्या शरीरावरील जखमा हळुहळू बऱ्या होत आहेत. अशा परिस्थितीतून अंकित बचावल्यामुळे लोक त्याच्या शौर्याचे कौतुक करत आहेत.