सिवनी: गेल्या शेकडो-हजारो वर्षांपासून मानव प्राण्यांवर अत्याचार करत आलाय. प्राण्यांना वाईट वागणूक देण्याच्या बाबत माणूस कितीही खालच्या पातपळीवर जाऊ शकतो. अशाच प्रकारचे एक प्रकरण मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात घडले आहे. वाघाच्या दोन बछड्यांना गावकऱ्यांनी दगडं मारुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघाचे दोन लहान बछडे गावातील तलावाजवळ पाणी पिण्यासाठी आले होते. यावेळी गावकऱ्यांनी त्यांना दगडं मारुन गंभीर जखमी केले. या घटनेत बछडे इतके जखमी झाले की, त्यांना चालताही येत नव्हतं. या हृदयद्रावक घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये गावकरी पिलांना दगडं मारताना आणि पकड-पकड, असे ओरडताना दिसत आहेत.
पहा व्हिडिओ:-
वनविभागाने केली सुटका
वनविभागाच्या पथकाला याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्या दोन बछड्यांची सुटका केली. सध्या दोन्ही पिलांना येथील कान्हा व्याघ्र प्रकल्पातील बचाव केंद्रात पाठवण्यात आले आहे. दरम्यान, सिवनी वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक एस. एस. उद्दे यांनी सांगितले की, ही घटना जिल्हा मुख्यालयापासून 50 किमी अंतरावर असलेल्या बेळगाव गावाजवळ मंगळवारी सकाळी घडली आहे.